BS Yediyurappa | (Photo Credit : Facebook)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (Karnataka CM BS Yediyurappa) लवकरच आपल्या पदाचा राजीनामा ( Karnataka CM BS Yediyurappa Resign) देतील असे वृत्त आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (CM BS Yediyurappa) यांनीही पदाचा राजीनामा देण्यास तयारी दर्शवल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बीएस येडीयुरप्पा यांच्यात शुक्रवारी (16 मार्च) एक बैठक झाली. या बैठकीदरम्यान, येडीयुरप्पा यांनी वाढत्या वयाचे कारण देत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, येडीयुरप्पा यांचा राजीनामा पक्ष स्वीकारणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.

भाजप कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल करु इच्छितो की नाही यावर येडीयुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला जाणार की नाही हे अवलंबून असणार आहे. जर कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाबाबत भाजप इच्छुक असेल तर येडीयुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला जाईल. असे घडले तर कर्नाटकमध्ये 26 जुलै पूर्वी नवा मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतो. येत्या 26 जुलै रोजी येडीयुरप्पा यांनी कर्नाटकचे मख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. येडीयुरप्पा यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोणाकडे जाणार याबाबत मात्र अद्याप कोणतेही नाव पुढे आले नाही. पंतप्रधानांप्रमाणेच येडीयुरप्पा यांनी शनिवारी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्यासोब चर्चा केली. (हेही वाचा, Sharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात)

भल्या सकाळी दिल्ली येथे पोहोचलेले येडीयुरप्पा यांना प्रसारमाध्यमांनी राजीनाम्याबाबत विचारले. यावर प्रतिक्रिया देताना येडीयुरप्पा यांनी म्हटले की, राजीनाम्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चा केली. प्रसारमाध्यमांनी या भेटीबाबतही विचारले असता त्यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये आम्ही पक्ष विस्ताराबाबत चर्चा करत आहोत. माझ्याकडे बरेच पर्याय आहेत. मी पक्षाला दुसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करेन.

दरम्यान, पाठीमागील अनेक महिन्यांपासून कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळतो आहे. अनेक नेत्यांनी उघडपणे येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाकडे बोट दाखवले आहे. टीका केली आहे. परंतू, इतका असंतोष असूनही ही अगदीच सर्वसाधारण स्थिती असल्याचे येडीयुरप्पा नेहमीच सांगत आले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेला अधिक महत्त्व आहे. दरम्यान, अधिकृत प्रतिक्रिया देताना येडीयुरप्पा यांनी सांगितले की, कर्नाटकच्या विकासाच्या संदर्भात ही भेट झाली आहे.