Sharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात
Sharad Pawar, PM Narendra Modi | (Photo Credits: PMO/ Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Sharad Pawar Meet PM Narendra Modi) यांच्यात राजधानी दिल्ली येथे आज (17 जुलै) भेट झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तासभर ही चर्चा झाली. या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. प्रदीर्घ काळानंतर झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. संसदेचे अधीवेशन सुरु होण्यापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये राजकीय आणि इतर भेटीगाठींना उधान आले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि पीयूष गोयल यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वेगवेगळ्या भेटी घेतल्या. त्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पवार यांच्यात भेट होत आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीयदृष्ट्या अधिक सतर्कतेने पाहिले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट होण्याचे ही पहिलीच वेळ नाही. या आधी कित्येक वर्षांपासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्नेहबंध राहिला आहे. अगदी शरद पवार केंद्रात मंत्री आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमत्री असल्यापासून. 2014 नंतर केंद्रात एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतरही या भेटी कायम राहिल्याचे अनेकदा पाहायाला मिळाले. परंतू, 2019 नंतर मात्र जेव्हा केंद्रात एनडीएचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर कायम राहिले. त्यानंतर या भेटी काहीशा कमी होताना दिससल्या. (हेही वाचा, Rohit Pawar Tweet: प्रश्रमने केलेल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी पाचव्या स्थानी असल्याचे दु:ख भाजपला वाटू नये, रोहित पवारांची टीका)

पीएमओ ट्विट

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजप सर्वाधिक जागा मिळवून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. परंतू, असे असूनही शरद पवार यांनी ऐतिहासिक राजकीय खेळी करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आदी पक्षांसोबत एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे देशभर उधळलेल्या भाजपच्या विजयवारुला मोठ्या विजयानंतरही लगाम लावता येऊ शकते हे शरद पवार यांनी दाखवून दिले. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी असे प्रयोग झाले. आता भाजपला लोकसभा निवडणूक 2024 महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने भाजपने पावले टाकण्यास सरुवात केली आहे. 2024 मध्ये भाजपला कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी नव्याने रणनिती आखल्याचे दिसते. शरद पवार यांची भेट या रणनितीतून पाहिली जात आहे.