कानपूर देहातच्या (Kanpur dehat) मडौली गावात अतीक्रमण हटवत असताना झोपडीतील आई आणि मुलीचा जिवंत जळून मृत्यू झाल्यानंतर देशभरातून उत्तर प्रदेशच्या सरकारवर टिका होत आहे. या प्रकरणी पीडित कुटुंब आणि गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नातेवाईकांनी हे दोन्ही मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत मृतदेह स्विकारणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. यानंतर आता उत्तर प्रदेश सरकार एक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणात जेसीबी चालकाला अटक करण्यात आली असून एसडीएम ज्ञानेश्वर प्रसाद (dyaneshwar prasad) आणि लेखपाल अशोक सिंह (ashok singh) यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात एकुण ३८ लोकांविरोधात एफआईआर नोंदवण्यात आली आहे.
मडौली गावच्या कृष्ण गोपाल दिक्षित यांच्यावर गावातील जमिनीवर अतीक्रमण केल्याचा आरोप आहे. जानेवारी महिन्यात कृष्ण गोपाल दिक्षित यांच्या विरोधात अतीक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. या प्रकरणी एसडीएम ज्ञानेश्वर प्रसाद यांच्या नेतृत्वात पोलीस आणि प्रशासन विभाग अतिक्रमण हटवण्यासाठी पोहचले होते. अधिकाऱ्यांनी कृष्ण गोपाल दिक्षित यांच्या झोपडीवर बुलडोझर चालवला. यादरम्यान झोपडीला आग लागली आणि आगीत कृष्ण गोपाल दिक्षित यांची पत्नी प्रमिला आणि मुलगी नेहा यांचा जळून मृत्यू झाला. (Gurugram Shocker : गुरुग्रामच्या सहारा मॉलच्या बेसमेंटमध्ये महिलेवर बलात्कार)
या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणवर तणाव निर्माण झाला असून गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना गावातून पळवून लावले तसेच पोलिस आणि प्रशासनाच्या वाहनांवर देखील हल्ला केला आहे. तणाव वाढल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मृतांच्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना दिले आहे.