Jnanpith Award 2019: मल्याळम कवी अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
कवी अक्किथम (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्काराकडे (Jnanpith Award) पाहिले जाते. नुकतेच यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मल्याळम कवी अक्किथम (Akkitham) यांना 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अक्किथम यांचे पूर्ण नाव अक्किथम अच्युतन नम्बोद्री (Akkitham Achuthan Namboodri) असून, त्यांचा जन्म 1926 साली झाला. त्यांनी 55 पुस्तके लिहिली असून त्यातील 45 कवितासंग्रह आहेत. 11 लाख रुपये, वाग्देविची मूर्ती, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

अक्किथम यांना लहानपणापासूनच साहित्य आणि कलेमध्ये रस होता. कवितेव्यतिरिक्त, त्यांनी नाटके आणि कादंबऱ्याही लिहिली आहेत. त्यांच्या बहुतेक काव्यात्मक साहित्यामध्ये एक अद्वितीय भविष्यसूचक पात्रे दिसून येतात. ते आपल्या कवितेतून अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवितात. अक्किथम हे त्यांच्या कवितेतून आधुनिकता दर्शविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अक्किथम यांच्या कवितांमध्ये भारतीय तत्वज्ञानाची आणि सामाजिक मूल्यांची जोड आहे, जी आधुनिकता आणि परंपरा यांच्यातील दुवा दर्शवते. (हेही वाचा: इंग्रजी लेखक Amitav Ghosh यांना 2018 चा साहित्यातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर)

पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या अक्किथम यांना साहित्य अकादमी पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (दोनदा), मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. दरम्यान, साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यातील मानाचा पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत हिंदी भाषेत 11, कन्नड भाषेत 8, बंगाली भाषेत 6 तर गुजराती, मराठी, ओडिया आणि उर्दू भाषेत 4 ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले आहेत.