हापूस आंबा photo credits PTI File Photo

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणा-या हापूस आंब्याला (Mango) भारताबरोबर विदेशातही तितकीच मागणी आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात आंब्याच्या सिझनला कित्येक टन आंबा विदेशात निर्यात केला जातो. मात्र ह्या वर्षी जेट एअरवेजची (Jet Airways) उड्डाणे बंद झाल्याचा फटका हापूस आंब्याला बसला असून, आंबा उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जेट एअरवेज बंद पडल्याने अन्य विमान कंपन्यांनी कार्गोचे दर वाढवले असून, परिणामी निर्यातकारांनी निर्यातच कमी केली आहे.

जेट एअरवेजने फ्रान्सच्या केएलएम कंपनीसह कार्गो वाहतूक सुरू केली होती. त्याद्वारे मुंबईतून फळे व भाज्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. तर उन्हाळ्यात मार्च ते मे दरम्यान हापूस आंब्याची निर्यात व्हायची. जेट एअरवेजद्वारे होणाऱ्या हापूसच्या या निर्यातीचा रोजचा आकडा ४५ ते ५० टन इतका होता. मात्र जेट एअरवेज बंद झाल्यामुळे त्याचा फटका आंबा निर्यातीवर झाला.

जेटने सेवा बंद केल्याने इतर विमान कंपन्यांनी निर्यातीचे दर 15 टक्क्यांनी वाढवले आहेत. या दरवाढीचा परिणाम आंब्याच्या किमतीवर होऊन परदेशी ग्राहक 15 ते 20 टक्के जास्त दराने आंबा खरेदी करण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे परदेशी ग्राहकांची मागणी लक्षात घेता निर्यातदारांनी निर्यातच कमी केली असून निर्यातीचा 200 टनांचा आकडा यंदा 90 टनांवर येऊन पोहोचलाय.

जेट एअरवेज सुरू असताना सर्व कंपन्या मिळून युरोपात रोज ५० टन व आखाती देशात ९० टन हापूसची निर्यात करीत होते. त्यावेळी युरोपात आंबा पाठविण्यासाठी ८० रुपये प्रति किलो इतका खर्च येत होता. आखाती देशांसाठीचा दर ६० रुपये प्रति किलो होता. जेटच्या सेवा बंद पडल्यानंतर आता युरोपसाठीचा दर ११० तर आखाती देशांचा दर ९० रुपये प्रति किलो झाला आहे. सध्या दररोज साधारण जेमतेम ४० ते ४५ टन हापूसची निर्यात होत आहे.

आंबा खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी, असा ओळखा कोकणी हापूस

गेल्या पाच वर्षांत बंद पडलेली जेट एअरवेज ही देशातील सातवी नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे. यापूर्वी एअर पेगासस, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा व झूम एअर या विमानसेवा देणाऱ्या कंपन्या बंद पडल्या आहेत.