प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

उन्हाळा आणि आंबा यांचे नाते काही औरच आहे. आंबा हे मोसमी फळ असल्याने, उन्हाळ्यात यावर जितका शक्य असेल तितका ताव मारला जातो. त्यात महाराष्ट्रात हापूसचे (Hapus) महत्व आणि लोकप्रियता वर्षानुवर्षे वाढतच आहे. सध्या आंब्याचा हंगाम जोरदार सुरू आहे, बाजारात हापूस, बदामी, पायरी असे अनेक प्रकार दाखल झाले आहेत. यात हापूसची मागणी नेहमीप्रमाणेच अधिक आहे. मात्र आंबे खरेदी करताना हापूसच्या नावाखाली इतर प्रकारचे आंबे विकले जातात. कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील आंबा विकत असल्याचे चित्रही दिसून येते. त्यामुळे आंबे खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी हापूस नक्की कसा ओळखावा हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

> हापूस आंब्याच्या देठाला वास येतो, तर दुसऱ्या आंब्याच्या देठाचा वास फार कमी येतो.

> रत्नागिरी हापूस खालून गोलाकार असतो, इतर हापूस खालून टोकदार असतात. खरेदी करताना मध्यम आकाराचे घेतलेले उत्तम.

> रत्नागिरी आंबा कापल्यावर आतील बाजूस केशरी रंगाचा दिसतो, तर इतर आंबा पिवळसर रंगाचा असतो. (हेही वाचा: जिलेबी, गुलाबजाम, इडली यांसारखे अनेक पदार्थ भारतीय नाहीत; जाणून घ्या नक्की कुठून आले हे पदार्थ)

> रत्नागिरी हापूस आंबा तयार झाल्यावर त्याच्यावर सुरकुत्या पडतात.

> नैसर्गिकरित्या पिकणारे आंबे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात, तर नुसते पिवळे दिसणारे आंबे हे केमिकलचा वापराने पिकवली जातात. त्यामुळे ती आतील बाजूस केशरी न दिसता पिवळसरच दिसतात.

> रत्नागिरी हापूस आंब्याची साल पातळ असते. देवगडची तर इतकी पातळ असते की ते आंबे मार्च आणि एप्रिलपर्यंतची उष्णता सहन करू शकतात. इतर आंब्यांची साल जाड असते.

> रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी अठरा ते वीस इंच इतकी असते. कर्नाटक हापूसची पेटी मात्र त्यापेक्षा लहान असून साधारण ती चौदा ते पंधरा इंचाची असते.