Terrorists | Image Used for Representational Purpose | (Photo Credits: ANI) |

गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथे सतत दहशतवादी हल्ले (Terror Attack) होत आहेत. आता इथल्या संघटनांबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू-काश्मीरमधील 700 तरुणांना आपल्या संघटनेत सामावून घेतले आहे व इथल्या खोऱ्यात 141 दहशतवादी अजूनही सक्रिय आहेत. त्यापैकी बहुतांश परदेशी आहेत. अशाप्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने दहशतवाद्यांची उपस्थिती सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी लॉन्च पॅड्समधून सतत घुसखोरी होत असल्याचे संकेत आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 5 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 82 परदेशी दहशतवादी सक्रिय होते. त्याचवेळी सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 59 होती. यातील बहुतांश दहशतवादी लष्कर-ए-तैयबा, त्याची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.

विविध दहशतवादी संघटनांनी चार वर्षांत 700 स्थानिक तरुणांची भरती केली. 2018 मध्ये 187 स्थानिक तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181 आणि 2021 मध्ये 142 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. जून 2022 अखेर 69 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत.

यावर्षी 55 चकमकीत 125 दहशतवादी मारले गेल्याचे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. त्यापैकी 91 स्थानिक तर 34 परदेशी होते. याशिवाय अशा चकमकीत 123 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 172 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्याच वेळी, 2020 मध्ये 251, 2019 मध्ये 148 आणि 2018 मध्ये 185 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले असून, 23 जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी दहशतवादी हल्ल्यात 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्याच्या 8 घटना घडल्या. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 146 दहशतवादी मारले गेले. त्याचवेळी सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आणि 41 नागरिकांना प्राण गमवावे लागले. 2020 मध्ये 215 दहशतवादी मारले गेले, 19 सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले आणि 38 नागरिक मारले गेले. (हेही वाचा: नाटकात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक)

2019 मध्ये 148 दहशतवादी मारले गेले, 49 जवान शहीद झाले आणि 46 नागरिक मारले गेले. 2018 मध्ये 185 दहशतवादी मारले गेले, 7 जवान शहीद झाले आणि 72 नागरिक मारले गेले. 2021 मध्ये 63, 2020 मध्ये 165, 2019 मध्ये 376 आणि 2018 मध्ये 765 जवान दहशतवादी घटनांमुळे जखमी झाले.