LOC | Photo Credits: Twitter/ ANI

भारतासह जगभरात कोरोना व्हायरचा हाहाकार सुरू असताना पाकिस्तानकडून कुरापती सुरूच असल्याचं चित्र आहे. दरम्यान जम्मू कश्मीर मधीक कुपवाडा जिल्ह्यातील रंगवार येथील प्रांतामध्ये काल (12 एप्रिल) पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामध्ये 3 स्थानिकांचा बळी गेला असून काही घरं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान मृतांमध्ये लहान मुलगा आणि दोन महिलांचा समावेश होता.

एलओसीच्या पलिकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये आगीचा भडका उडाला आणि स्थानिकांमध्ये घबराट पसरली. दोन तास सुरू असलेल्या या धुमचक्रीमुळे गावातील अनेकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला. या हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय सेनेकडूनदेखील तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आलं.

दरम्यान शनिवार (11 एप्रिल) च्या रात्रीदेखील बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग झाल्याचं पहायला मिळालं होतं. बालाकोटमध्ये एक जिवंत बॉमदेखील भारतीय सेनेच्या जवानांना मिळाला. सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश कोरोना व्हायरससारख्या महामारीचा मुकाबला करत आहे. अशामध्ये पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन ही चिंतेची बाब आहे.

मागील रविवारी देखील केरन सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 5 आर्मी जवान धारातीर्थी पडले होते.