Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani), जरी जगातील श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले तरी त्यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अब्जाधीश मुकेश अंबानी यांना सोमवारी 3.6 अब्ज डॉलर्सचा धक्का बसला आणि त्यांची संपत्ती आता 75.8 अब्ज डॉलर्सवर आली आहे. जगातील अव्वल दहा सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतून ते जरी बाहेर पडले असले तरी, त्यांच्या संपत्तीमध्ये कोरोना कालावधीत निरंतर वाढ झाली. ताज्या अहवालानुसार कोरोना काळात श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत झाले आहेत आणि गरीब अजूनच गरीब झाले आहेत.

अहवालात उत्पन्नातील असमानतेचा संदर्भ देताना सांगितले गेले आहे की, मुकेश अंबानी यांनी कोरोना साथीच्या वेळी एका तासामध्ये मिळवलेल्या रकमेची कमाई करण्यासाठी एखाद्या अकुशल कामगाराला दहा हजार वर्षे लागतील किंवा मुकेश अंबानी यांनी एका सेकंदात मिळवलेले उत्पन्न मिळविण्यासाठी अकुशल कामगारांना तीन वर्षे लागतील. दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या ऑक्सफॅम (Oxfam) या संस्थेने म्हटले आहे की कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन दरम्यान भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 35 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे कोट्यवधी लोकांच्या रोजीरोटीचे संकट या काळात वाढले.

ऑक्सफॅमच्या 'विषमता विषाणू'च्या अहवालानुसार मार्च 2020 नंतरच्या काळात भारतातील 100 अब्जाधीशांची संपत्तीमध्ये 12,97,822 ची वाढ झाली. ही रक्कम देशातील 13.8 कोटी गरीब लोकांमध्ये वाटप केली गेली तर त्या प्रत्येकाला 94,045 रुपये मिळू शकतील. अहवालानुसार कोरोना विषाणू साथीचा आजार गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठे आरोग्य संकट आहे. यामुळे 1930 च्या महामंदीनंतर सर्वात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. (हेही वाचा: PPF, NSC, SSY या योजनांमधील गुंतवणूकीवर मिळते प्राप्तिकर सूट; जाणून घ्या नियम)

अहवालानुसार कोरोना काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नादर, सायरस पूनावाला, उदय कोटक, लक्ष्मी मित्तल अशा अनेक धनाड्य लोकांची संपत्ती झपाट्याने वाढली आहे. या लोकांची संपत्ती अक्षरशः झपाट्याने वाढत होती तर दुसरीकडे एप्रिल 2020 मध्ये दर तासाला 1.7 लाख लोक बेरोजगार झाले.