Citizenship Amendment Act Protest (Photo Credits: ANI)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीविरोधात (NRC) सलग दुसर्‍या शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर, दिल्ली, सीलमपूर, जोर बाग आणि झाफराबाद येथील जामा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मीचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले होते. हजारो लोकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यामध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि दिल्लीमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता पाहता पोलिसांचा फौजफाटा सज्ज होता. प्रत्येक मशिदीच्या बाहेर 10-10 स्वयंसेवक तैनात होते. मात्र अजूनही उत्तर प्रदेशच्या 21 जिल्ह्यांमध्ये इन्टरनेट बंदी आहे तसेच काही संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जरी करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशच्या लखनऊ, मुरादाबाद, अमरोहा, संभल, गाजियाबाद, मेरठ, कानपुर, सीतापुर, शामली, बुलंदशहर, सहारनपुर, फिरोजाबाद आणि मथुरासोबत 21 जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे. गेल्या शुक्रवारी उत्तर प्रदेशातील 22 जिल्ह्यांमध्ये निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 22 जण ठार झाले होते. मात्र आता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती यूपीचे डीजीपी ओपी सिंह यांनी दिली. कोणताही निष्पाप पकडला जाणार नाही आणि जे हिंसाचारात सामील होते त्यांनादेखील सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

गेल्या आठवड्यात राज्यातील विविध शहरांमधील नमाजानंतर झालेला हिंसाचार पाहता, यावेळी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. शुक्रवारी डीजीपी ओम प्रकाश सिंह यांनी नमाजसाठी विशेष अलर्ट जारी केला होता. मेरठ आणि अलीगढमध्ये गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून इंटरनेट बॅनचे आदेश देण्यात आले आहेत. यूपीच्या संवेदनशील मुजफ्फरनगर जिह्यात 28 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा: CAA: भारतीय नागरिकत्व कसे मिळते? काय आहेत राज्यघटनेतील तरतुदी? वाचा सविस्तर)

मेरठ, बिजनौर, मुझफ्फरनगर, सहारनपूर, बागपत, शामलीसमवेत संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशात हाय अलर्ट असेल. नमाजच्या अनुषंगाने मेरठ शहरातील 22 संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुरुवारी डीएमच्या आदेशानुसार शुक्रवारी व शनिवारी बारावीपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.