Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

गेल्या एका वर्षात गहू वगळता सर्व आवश्यक खाद्यपदार्थाच्या किंमती वाढल्या आहेत. बटाट्याच्या (Potato) किंमतींमध्ये सर्वाधिक 92% वाढ झाली, तर कांदे (Onion) वर्षात 44% महागले. तज्ञांचे मत आहे की ही महागाई तात्पुरती आहे आणि पुरवठा सुधारल्यावर महागाई कमी होईल. आकडेवारीनुसार भाजीपाला, मांस-मासे आणि डाळींचे भाव विशेषत: वाढले आहेत. बाजारातील कांदा इतका महाग झाला आहे की ग्राहक व्यवहार मंत्रालयाला मर्यादा निश्चित करावी लागली. जर बटाट्यांच्या किंमतीही वाढल्या तर सरकार आपली स्टॉक मर्यादा देखील लागू करू शकते.

रिझर्व्ह बँक म्हणते की पुढील वर्षाच्या सुरूवातीस किंमती नियंत्रणात येऊ शकतात. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, घाऊक बाजारात गेल्या एका वर्षात बटाट्यांच्या किंमतीत 108% वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी बटाटा मोठ्या प्रमाणात 1,739 रुपये प्रतिक्विंटलला विकला जात होता तर आता तो 3,633 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. शनिवारी कांद्याचे दर प्रति क्विंटल 5,645 रुपये होते, ते एक वर्षापूर्वी 1,739 होते. म्हणजेच वर्षभरात कांद्याचे दर 47% वाढले आहेत.

गेल्या पाच वर्षात बटाटाच्या किरकोळ किंमतींचा तुलनात्मक अभ्यास केल्यास हे दिसून आले आहे की, किंमती 16.7 रूपये प्रती किलोवरून 43 रुपये किलोपर्यंत वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारकडे बटाटा साठ्यावर मर्यादा घालण्याचा पर्याय आहे. परंतु सध्या किंमती वाढल्यावर बटाटे आयात करणे यासारखे सर्व पर्यायांचा सरकार विचार करेल, जेणेकरून किंमतींवर अंकुश ठेवता येईल. शुक्रवारी सरकारने भूतानकडून बटाट्याच्या आयातीला सूट दिली आहे.

बटाटा आणि कांद्याव्यतिरिक्त डाळींचे दर वाढल्यामुळे घरांचे बजेटही विस्कळीत झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून घाऊक आणि किरकोळ महागाईच्या आकडेवारीमध्येही हा ट्रेंड दिसून येत आहे. अन्नाच्या किंमती वाढल्यामुळे उर्वरित आकडेवारीवर परिणाम झाला. आकडेवारीनुसार भाज्या, मांस-मासे आणि डाळीसारख्या खाद्यपदार्थांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.