देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराने माजवलेला हाहाकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी लादलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे चालू आर्थिक वर्षात, भारताचा जीडीपी (GDP) 9.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेने (World Bank) गुरुवारी हा अंदाज जाहीर केला. जागतिक बँकेने म्हटले आहे की, भारताची आर्थिक परिस्थिती पूर्वीच्या वेळेपेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे कंपन्या व लोक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासह, साथीच्या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी देशभर लादलेल्या लॉकडाऊनचाही यावर विपरित परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या वार्षिक बैठकीपूर्वी वर्ल्ड बँकेने नुकत्याच झालेल्या दक्षिण आशिया इकॉनॉमिक फोकस पॉईंटच्या अहवालात हा अंदाज वर्तविला आहे. अहवालात, जागतिक बँकेने 2020 मध्ये दक्षिण आशिया प्रदेशात 7.7 टक्के आर्थिक घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात वार्षिक सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या अहवालात म्हटले आहे की, 'मार्च 2020 मध्ये सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत 9.6 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.' मात्र अहवाल असेही सांगितले आहे की, 2021 मध्ये आर्थिक वाढीची दर पुन्हा रुळावर येऊन तो 4.5 टक्के राहू शकतो.
जागतिक बँकेने म्हटले आहे की, लोकसंख्येतील वाढीनुसार पाहिले तर दरडोई उत्पन्न 2019 च्या अंदाजाप्रमाणे सहा टक्के राहू शकते. हे सूचित करते की, 2021 मध्ये जरी आर्थिक वाढीचा दर वाढला तरी तो चालू आर्थिक वर्षातील नुकसानीची भरपाई करणार नाही. जागतिक बँकेचे दक्षिण आशियाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ हॅन्स टिमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या परिस्थितीपेक्षा भारताची परिस्थिती बिकट आहे.' चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जून तिमाहीत) भारताच्या जीडीपीमध्ये 25 टक्क्यांनी घट झाली आहे.
जागतिक बँकेने या अहवालात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांनी भारतातील पुरवठा आणि मागणीची परिस्थिती गंभीरपणे विस्कळीत केली आहे. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून देशव्यापी संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनमुळे सुमारे 70 टक्के आर्थिक क्रियाकलाप, गुंतवणूक, निर्यात आणि वापर ठप्प होते.