पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल (Israel) असा संघर्ष पुन्हा एकदा पेटला असताना आणि हमासने गाझा पट्टीत (Hamas Attack) केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. इस्त्राईलमधील भारतीय नागरिकांना सूचना जारी करताना दूतावासाने म्हटले आहे की, नारिकांनी सतर्क राहायला हवे आणि सुरक्षेचे सर्व प्रोटोकॉल पाळायला हवेत. दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या सल्लापत्रात म्हटले आहे की, कृपया सावधगिरी बाळगा, अनावश्यक हालचाल टाळा आणि सुरक्षितता निवारा जवळ रहा.
अतिरिक्त माहितीसाठी, कृपया इस्रायली होम फ्रंट कमांड वेबसाइट https://www.oref.org.il/en यांना भेटद्या किंवा वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. काही आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली तर आमच्याशी +97235226748 वर संपर्क साधा, किंवा cons1.telaviv@mea.gov.in. वर संदेश पाठवा. कोणत्याही मार्गदर्शनासाठी दूतावासाचे कर्मचारी तुमच्या संपर्कात आहेत, असेही दूतावासाने म्हटले आहे. (हेही वाचा, Israel Declares State of War: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा एकदा लष्करी संघर्षच; गाझा पट्टी रॉकेट हल्ला, विमान हल्ल्यापूर्वी सायरन वाजले)
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हमासने गाझा पट्टी आणि इस्त्रायलच्या काही भागांमध्ये रॉकेट हल्ला केला. तसेच, सकाळी 8.15 (स्थानिक वेळेनुसार) वाजता जेरुसलेमध्ये अनेक वेळा विमानहल्ल्यापूर्वचे सायरन ऐकू आले. सकाळी 10:15 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सायरन पुन्हा ऐकू आले.
दरम्यान, भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी भारतातील लोकांच्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि ते म्हणाले, "आम्ही दहशतवादाचा सामना करत आहोत. हमासच्या सैनिकांची घुसखोरी आणि गाझामधून क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलने देशात आधीच युद्ध स्थिती जाहीर केली आहे. इस्रायल संरक्षण दलाने सांगितले की, गाझा पट्टीतील हमास गटाच्या ठिकाणांवर डझनभर लढाऊ विमाने हल्ले करत आहेत. इस्रायली वायुसेनेची डझनभर लढाऊ विमाने आता गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेच्या लक्ष्यांवर अनेक ठिकाणी हल्ले करत आहेत, असे इस्त्रायली हवाई दलाने X वर पोस्ट केले. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा जागतिक नेत्यांनी निषेध केला.
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान, ऋषी सुनक यांनी X वर पोस्ट करत या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला, आज सकाळी इस्रायली नागरिकांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे मला धक्का बसला आहे. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि इस्रायलमधील ब्रिटिश नागरिकांनी प्रवासाच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देखील इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करत पोस्ट करत म्हटले आहे की, सध्या इस्रायलवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. मी पीडित, त्यांचे कुटुंब आणि प्रियजनांसोबत माझी पूर्ण एकता व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियन परराष्ट्र व्यवहार मंत्री, पेनी वाँग यांनी शहरे आणि नागरिकांवर अंदाधुंद रॉकेट गोळीसह हमासने इस्रायलवरील हल्ल्यांचा निषेध केला.