
एच5एन1 (H5N1) हा एक प्रकारचा अत्यंत रोगजन्य पक्षी इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) विषाणू आहे, जो मुख्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो, परंतु काही प्रसंगी इतर प्राणी आणि मानवांनाही संक्रमित करू शकतो. सध्या, जगभरातील वन्य पक्ष्यांमध्ये आणि कुक्कुटपालनातील पक्ष्यांमध्ये एच5एन1 विषाणूचे संक्रमण आढळले आहे. गेल्या काही काळापासून अमेरिकेतून बर्ड फ्लूच्या बातम्या सतत येत होत्या. मानवांमध्येही बर्ड फ्लूची प्रकरणे नोंदवली जात होती. पण आता भारतामध्ये पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे व यामुळे चिंता वाढली आहे. हा विषाणू मानवांनाही संक्रमित करू शकतो.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. साधारण 18 मांजरींच्या मृत्यूनंतर, नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी दोन मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आला. देशात मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मांजरींच्या मृत्यूनंतर प्रशासन सतर्क आहे. त्यांनी सांगितले की, मटण, चिकन आणि अंडी खरेदी-विक्रीवर 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच, बाधित भागातील सर्व मटण आणि चिकन दुकाने सील करण्यात आली आहेत.
यासोबतच मांजरींच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी केली जात आहे. सर्व 65 व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आले. मात्र, सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे, छिंदवाड्यात H5N1 चा धोका सध्या तरी टळला आहे. परंतु, आरोग्य विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अहवाल मिळाल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचे उपाय केले आणि मटण मार्केट परिसरातून 40 हजार अंडी जप्त करून ती नष्ट केली. तसेच, शहराबाहेर जामुंझिरी कचराकुंडीजवळ खोदलेल्या खड्ड्यात 500 कोंबड्या जप्त करून पुरण्यात आल्या.
इथे संसर्गाने बाधित क्षेत्रांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच, मांजरींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. छिंदवाडा हे नागपूरच्या सीमेवर असून, इथे डिसेंबरमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक मोठ्या मांजरींचा मृत्यू झाला होता. तपासणीनंतर संशोधकांना विषाणूमध्ये 27 उत्परिवर्तन आढळले आहेत, ज्यामुळे सस्तन प्राण्यांपासून ते संभाव्य मानवांपर्यंत प्रजातींमध्ये ते पसरण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. (हेही वाचा: New Coronavirus Found In China: जगावर पुन्हा महामारीचं संकट? चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू)
दरम्यान, एच5एन1 विषाणूचे मानवांमध्ये संक्रमण दुर्मिळ आहे आणि सामान्यतः संक्रमित पक्ष्यांशी थेट संपर्क आल्यास होते. फेब्रुवारी 2025 मध्ये, कंबोडियामध्ये एका 2 वर्षीय मुलाचा एच5एन1 मुळे मृत्यू झाला, जे या वर्षातील दुसरे प्रकरण होते. मानवांमध्ये एच5एन1 संक्रमणाची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असू शकतात, ज्यामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, डोळ्यांची जळजळ (कंजंक्टिव्हायटिस), तसेच गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.