India Lockdown-Unlock: जाणून घ्या कोणत्या राज्यांनी वाढवला लॉकडाउन तर 'या' राज्यात निर्बंध हटवण्याची तयारी सुरु
Representational Image | (Photo Credits: IANS)

India Lockdown-Unlock: देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्याचे नावच घेत नाही आहे. अशातच काही राज्यांनी लॉकडाउन आणि त्यासंबंधित कठोर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध काही राज्यांनी मे महिन्याच्या आधीच लागू केले आहेत. काही राज्यात हे नियम मार्च-एप्रिल पासून कायम ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान आता दिल्ली,हरियाणा आणि राजस्थानसह अन्य काही राज्यांनी लॉकडाउन वाढवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरीही राज्यांना त्या संबंधित कोणताही धोका स्विकारायचा नाही आहे. परंतु काही राज्यांकडून अनलॉकिंगचा विचार केला जात आहे. तर केंद्र सरकार कडून जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लॉकडाउन बद्दल दिलासा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर जाणून घ्या देशभरात लॉकडाउन आणि अनलॉक बद्दल कोणती तयारी करण्यात आली आहे.

रविवारी दिल्लीने एका आठवड्यासाठी लॉकडाउन वाढवला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 31 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम येथे लागू असणार आहेत. तसेच हरियाणाने 31 मे, राजस्थान मध्ये 8 जून पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. राजस्थान सरकारने यापूर्वी 10 ते 24 मे दरम्यान लॉकडाउन लागू केला होता. तो आता वाढवून 8 जून केला आहे. शनिवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मू-कश्मीर मध्ये कोरोना कर्फ्यू तर तमिळनाडू आणि मिझोराम येथे लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवला आहे.(Tata Steel कंपनीचा मोठा निर्णय, कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या परिवाराला 60 वर्षापर्यंत मिळणार पूर्ण वेतन) 

मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात सुद्धा 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. तर इंदौर मध्ये 31 मे पर्यंत कोरोना कर्फ्यू लागू असणार आहे. यामध्ये 28 मे पर्यंत कठोर लॉकडाउन असणार आहे. या दरम्यान, किराणा आणि फळभाज्यांचे मार्केट सुद्धा बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोल पंप, औषधांची दुकाने आणि दुध सप्लाय सुरु असणार आहे. इंदौरमध्ये 1 जून पासून लॉकडाउन उठवण्याची तयारी करण्यात आली आहे.

तर दिल्लीत 31 मे पासून अनलॉक करण्याची तयारी सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असे म्हटले आहे की, अद्याप कोरोनाच्या विरोधातील लढाई संपलेली नाही. जर कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी अशीच पुढील आठवड्यापर्यंत कायम राहिली तर हळूहळू लॉकडाउन उठवला जाईल.(COVID-19 In India: भारतामध्ये मागील तासांत 2,22,315 नवे कोरोनाबाधित; 4,454 मृत्यू)

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत चढउतार दिसून येत आहे. रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरीही नागरिकांना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान आर्थिक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लॉकडाउन हटवण्याबद्दल सावधगिरी बाळण्याचा सल्ला दिला आहे.