देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड प्रतिबंधक लसीच्या १७ कोटी मात्रा देऊन भारत हा जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश ठरला आहे. एकूण २४,७०,७९९ सत्रांमध्ये मिळून काल सकाळपर्यंत १७ ,०१,७६,६०३ कोविड लसीच्या मात्रा देशभरात देण्यात आल्या आहेत.
चीनला हा टप्पा गाठायला ११९ दिवस लागले तर अमेरिकेला हा टप्पा पूर्ण कार्याला ११५ दिवस लागले. दरम्यान जागतिक मदतीतून आलेले ६,७३८ ऑक्सिजन कोन्संट्रेटर ,३ ,८५६ ऑक्सिजन सिलिंडर, १६ ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प, ४,६६८ व्हेन्टीलेटर आणि ३ लाखांहून अधिक रेम्डेसिव्हीर च्या कुप्या विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना आत्तापर्यंत पुरवण्यात आल्या आहेत.
ही मदत हवाई किंवा रस्ते मार्गाने राज्यांना त्वरित पोहोचवण्यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे.देशातल्या वाढत्या कोरोना संसर्गावर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष असून हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सरकार तातडीच्या उपाययोजना करत आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकारची तयारी अपुरी पडल्याच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं आहे.
यासंदर्भात त्यांनी एका इंग्रजी दैनिकात खुलं पत्र लिहिलं आहे. दरम्यान राज्यातल्या कोविड स्थितीत सुधारणा होत असून जवळपास महिन्यानंतर चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी, नवबाधितांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी, आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या ६ लाखापेक्षा कमी झाली आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत.राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५ टक्के जास्त असून उपचाराधीन रुग्णसंख्येचं प्रमाणही तितकंच कमी आहे.