महाराष्ट्रात दररोज 30 मुलांचे अपहरण, 72 टक्के मुलींचा समावेश; लहानांवर होणार्‍या गुन्ह्यांच्या बाबतीत राज्याचा तिसरा नंबर
Representational Image (File Image)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) आकडेवारीनुसार, 2018 मध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक म्हणजे, 10623 मुलांचे अपहरण (kidnapping) झाल्याचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. म्हणजेच राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण केले जात आहे. चिंतेची बाब ही आहे की, अपहरण झालेल्या मुलांपैकी 72 टक्के या मुली आहेत.

याशिवाय मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था चाइल्ड राइट्स अँड यू (Cry) या संस्थेने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना, क्रायचे प्रादेशिक संचालक (पश्चिम) क्रिएन रबादी म्हणाले की, ‘मुलांबाबतची वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. राज्यात दररोज सरासरी 30 मुले गुन्ह्यांचा बळी ठरत आहेत. याव्यतिरिक्त, सर्वात जास्त 12 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींचे अपहरण झाले आहे.’ रबादी यांच्या म्हणण्यानुसार, 2017 च्या तुलनेत ही आकडेवारी ही चिंताजनक आहे. महाराष्ट्रात अपहरणाच्या घटनांमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे, पॉक्सोच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि बालहत्येमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये एकट्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि बिहारमध्ये बाल अपहरणांच्या 58 टक्के घटना घडल्या आहेत. (हेही वाचा: दहावीत शिकणाऱ्या मुलीकडून 2 वर्षाच्या मुलीची हत्या, पोटमाळ्यावर मृतदेह लपवला)

सन 2018 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 382 मुलांची हत्या झाली आहेत. महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असून, इथे 197 मुलांना आपला जीव गमवावा लागला. मध्य प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर आ,हे जिथे 135 मुलांची हत्या झाली आहे. सन 2018 मध्ये देशात मुलांवरील गुन्ह्यांच्या आरोपाखाली 1 लाख 41 हजार 764 गुन्हे दाखल झाले. सन 2017 मध्ये ही संख्या 1 लाख 29 हजार 32 इतकी होती. उत्तर प्रदेशात याबाबत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 1 लाख 41 हजार 764 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.