दहावीत शिकणाऱ्या मुलीकडून 2 वर्षाच्या मुलीची हत्या, पोटमाळ्यावर मृतदेह लपवला
KILL (File Photo)

अवघ्या दोन वर्षांच्या मुलीची (Two Year Kid ) इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय (Teenager Girl) मुलीने गळा दाबून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपीने पीडित चिमुकलीचा मृतदेह पोटमाळ्यावर लपवला. ठाणे जिल्ह्यात (Thane District) मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) तुळई ( Tulai Village) या गावात ही घटना घडली. मनिष्का जाधव असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या आईचे व आरोपी मुलीचे काही दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने हे कृत्य केले. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, शनिवारी दुपारपासून मनिष्का बेपत्ता होती. राहत्या घरातून ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चक्राऊन गेले. त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र, अनेक वेळ अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर मनिष्काचे वडील भाऊ जाधव यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेत पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. सुरुवातीला पोलिसांना तपास करताना आरोपींचा अंदाज आला नाही. मात्र, आपल्या खास पद्धतीने पोलिसांनी तपास सुरु केला असता पोलिसांना मनिष्का हिचा शोध लागला. (हेही वाचा, फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून बायकोने नवऱ्याला जिवंत जाळले)

पोलिसांनी केलेल्या तपासात मनिष्का हिचा मृतदेही जाधव कुटुंबीयांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाच्या पोटमाळ्यावर आढळून आला. मृतदेह पोटमाळ्यावर कसा? याचा अधिक तपास केला असता पोलिसांना मनिष्का हिची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. तसेच, ही हत्या शेजारीच राहणाऱ्या आणि इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीनेच केल्याचेही पुढे आले. आरोपी मुलगी आणि मनिष्का या दोघी एकमेकींच्या दूरच्या नातलग आहेत. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.