
Temperatures and Heatwaves Update: देशभरात यंदा पाठिमागच्या तुलनेत अधिक कडक उन्हाळा जावणाची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशभरातच उष्णतेची लाठ अनुभवायला मिळू शकते, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीने (IMD) हवामानाचा अंदाज वर्तवताना दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कडक इशारा दिला आहे. उष्ण आणि दमट हवामान नियमीत असले तरी, अपेक्षित उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय आवश्यक असल्याचेही आयएमडीने म्हटले आहे. येत्या 3 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत द्वीपकल्पीय भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती अपेक्षित आहे. ज्यामध्ये किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि तेलंगणा यासारख्या प्रदेशांचा समावेश आहे. उत्तर कर्नाटकातील एकाकी भागातही आठवड्यात उष्णतेची लाट येण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, झारखंड आणि आंध्र प्रदेशचे काही भाग वाढत्या तापमानाचा सामना करत आहेत. ज्यामुळे संभाव्य उष्णतेशी संबंधित आरोग्य धोक्यांची चिंता वाढली आहे. IMD चा अंदाज नजीकच्या भविष्याच्या पलीकडे विस्तारित आहे, एप्रिल ते जून या कालावधीत उत्तर मैदानाच्या विविध भागांमध्ये सामान्य उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत हंगामी बदलांबाबत रूपरेषा सांगितली. ते म्हणाले यंदाच्या वर्षी तापमान काहीसे चढे राहण्याची शक्यता आहे. खास करुन मध्य आणि पश्चिम भारतामध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. याउलट, पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य राज्ये आणि उत्तर ओडिशा यांसारख्या निवडक प्रदेशांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा कमी तापमान अपेक्षित आहे. (हेही वाचा, UP-Bihar Heatwave: उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 98 जणांचा मृत्यू)
अपेक्षित उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीवर भाष्य करताना महापात्रा यांनी देशभरातील सामान्य उष्णतेच्या लाटेच्या दिवसांच्या वारंवारतेवर अधिक भर दिला. वेगवेगळ्या भागांमध्ये 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट अनुभवायला मिळू शकते. काही ठिकाणी ती 4 ते 8 दिवसांच्या कालावधीपर्यंत राहू शकते. त्यामुळे संभाव्य परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना गरजेच्या असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा - UP: कडक उन्हात ट्रॅक वितळला आणि ट्रेनही गेली, लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली)
उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्णतेची लाट हा सामान्यपणे वापरला जाणारा शब्द असला तरी ती एक अधिकृत संकल्पना आहे. त्यामुळे विशिष्ट तापमानाची नोंद झाली की उष्णतेची लाट आली असे संबोधले जाते. त्याबाबतचे निकष स्थळ, काळ आणि तीव्रतेनुसार बदलू शकतात. ढोबळमानाने उष्णतेची लाट हा असामान्यपणे उच्च तापमानाचा कालावधी असतो. जो भारताच्या उत्तर-पश्चिम भागांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात उद्भवणाऱ्या सामान्य कमाल तापमानापेक्षा जास्त असतो. उष्णतेच्या लाटा सामान्यत: मार्च ते जून दरम्यान उद्भवतात आणि काही क्वचित प्रसंगी जुलैपर्यंत देखील वाढतात. अत्यंत तापमान आणि परिणामी वातावरणीय परिस्थिती या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या लोकांवर प्रतिकूल परिणाम करते कारण ते शारीरिक ताण निर्माण करतात, ज्यामुळे कधीकधी माणसांचा आणि प्राणी, पक्षांचा मृत्यूही संभवतो.