लग्नाच्या वरातीत नाचण्याचा मोह हा कुणाला आवरत नाही. त्यात वधू-वराला नाचविण्याचा प्रकार देखील सर्रासपणे पाहायला मिळतो. यात कधी कधी वधू-वर आनंदाच्या भरात बेभानहून नाचताना दिसतात. मात्र हेच नाचणे एका नवरदेवाच्या जीवावर बेतले आहे. ऐकून धक्का बसला ना! ही घटना घडलीय हैदराबाद येथे. लग्नात नवरदेवाने बराच नाच केल्याने त्याला हृद्यविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तेलंगणामधील निजामाबाद येथे घडली. गणेश असं 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे नवरदेवाच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गणेशचे 15 फेब्रुवारीला बोधन शहरात विवाहसोहळा संपन्न झाला. यानंतर लग्नाच्या वरातीत लोकांच्या आग्रहास्तव गणेश आणि त्याच्या पत्नीने वरातीत जोरदार डान्स केला. त्यानंतर आनंदाच्या भरात गणेश खूप वेळ आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता. काही वेळानंतर अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी कुटूंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. हृदय विकाराच्या झटक्याने गणेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अनपेक्षित ही घटना घडल्याने तेथील सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर डीजेच्या जोरदार आवाजामुळे गणेशला त्रास होत होता असं त्याच्या कुटूंबियांनी सांगितले. गणेशच्या मृत्यूने बोधन शहरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर अशा वेळी काय करावे हे कित्येकांना अनेकदा माहित नसते किंवा अनेकदा अशी घटना पाहिल्याने समोरचा व्यक्ती पूर्णपणे गोंधळून जातात. पण तुम्हाला माहित आहे का अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीवर खाली दिलेले महत्त्वाचे उपाय केल्यास कदाचित त्या व्यक्तीला जीवदानही मिळू शकेल.
हेदेखील वाचा- स्वत:च्या लग्नात नागिन डान्स करणे नवरदेवाला पडले महागात
पाहा कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी:
1) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळतं. अशावेळेस त्या रुग्णाला झोपवून एका कडेवर वळवा. असं केल्याने त्याला मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसंच फुप्फुसांना नुकसान होत नाही.
2) पल्स रेट कमी जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळ पायाकडचा रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असं केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो.
3) रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसंच जिने चढणं-उतरणं टाळावं.
4) रुग्णाभोवती जास्त गर्दी करू होणार नाही याची काळजी घ्या. त्याला पुरेशी हवा मिळेल नीट श्वास घेता येईल याची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतीही एक गोळी रुग्णाला द्यावी.
5) रुग्णाच्या मानेजवळ हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर तो 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतोय आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असं समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.
शेवटी आपण डॉक्टर नाही. हृदयविकारावर योग्य इलाज जरी डॉक्टर करू शकत असले तरी रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्या रुग्णावर त्वरित उपाय केल्यास त्याला काही वेळा साठी जीवदान मिळू शकते.