Himachal Pradesh: काय सांगता? शिमल्याला येत आहेत Donald Trum आणि Amitabh Bachchan; सरकारने जारी केले ई-पास
डोनाल्ड ट्रंप व अमिताभ बच्चन (संग्रहित संपादित प्रतिमा)

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे सरकारने राज्यात प्रवेशासाठी ई-नोंदणी आवश्यक केली आहे. पण आता या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावावरही पास देण्यात आल्याचे उघड झाले आहे. कॉंग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, दोन्ही पास एकच मोबाइल नंबर व आधार क्रमांकावर देण्यात आले आहेत. कोविड-19 च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे 27 एप्रिलपासून राज्यात प्रवेश घेण्यासाठी ई-पास असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दोन ई-पासचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये पासची वैधता 7 मे रोजीची आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या नावावर चंडीगडपासून शिमलाच्या सुन्नीसाठी हा पास बनविण्यात आला आहे व त्याला आवश्यक सेवांच्या श्रेणीनुसार परवानगी देण्यात आली आहे. यातील गाडीचा नंबर चंदीगडचा आहे. त्याचबरोबर दुसरा पास बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्या नावे जारी करण्यात आला आहे. हा पासदेखील 7 मे साठीचा आहे. यामध्ये चंदीगड ते शिमलाजवळील लोकेशन टाकण्यात आले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजीव सैजल यांच्या घरी जाण्याबाबत नमूद केले आहे. हे दोन्ही पास अत्यावश्यक सेवा गटात बनविण्यात आले आहेत. ही गाडीदेखील चंदीगडचीच आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या पाससाठी मारुती 800 आणि अमिताभ बच्चनच्या पास साठी बीट 2010 मॉडेलचा कार नंबर नमूद केला आहे. (हेही वाचा: COVID-19 च्या राष्ट्रीय नीतीमध्ये बदल, आता आरोग्य केंद्रात भरती होण्यासाठी पॉजिटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक नाही, जाणून घ्या नवी नियमावली)

संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर हिमाचल प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली आहे. सोशल मीडियावर माहिती देताना हिमाचल पोलिसांनी लिहिले की, त्यांना बनावट ई-पास बनवल्याची माहिती मिळाली आहे. शिमला पोलिस या संदर्भात गुन्हा दाखल करत आहेत व प्रकरणाची चौकशी सुरु आहे.