भारत आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये भरती होण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय नीतीमध्ये काही बदल केले आहेत. यापुढे आरोग्य केंद्रात भरती (Health COVID Centre) होण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक नाही असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही रुग्णाला कोविड सेंटरमध्ये मिळणा-या सुविधांपासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांनाही रिपोर्टशिवाय रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
त्याचबरोबर कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना औषधे आणि ऑक्सिजन सुद्धा देण्यात येईल. याआधी कोविड सेंटरमध्ये भरती होण्यासाठी रुग्णांकडे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक होते. मात्र यापुढे तो रिपोर्ट असणे बंधनकारक असणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.हेदेखील वाचा- कोरोना विरूद्ध लवकरचं चौथी लस येणार; आपत्कालीन वापरासाठी Zydus Cadila मागणार ZyCoV-D लसीची परवानगी
या निर्देशानुसार, तीन दिवसांच्या आत हे नियम लागू केले जातील. याअंतर्गत संशयित रुग्णाला त्वरित आरोग्य केंद्रात भरती केले जाईल. यात कोविड सेंटर, पूर्ण कोविड केअर सेंटर आणि कोविड रुग्णालयांचा समावेश आहे. एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
भारतात मागील 24 तासांत 4,01,078 नवे कोविड रुग्ण आढळले असून 4187 रुग्ण दगावले आहेत. दरम्यान गिलियड सायन्सेसकडून भेट म्हणून आलेल्या 25,600 रेमडेसिवीर आज सकाळी मुंबईत दाखल झाल्या आहेत.