Chandipura Virus Gujarat | (File Image)

गुजरात राज्यात चांदीपुरा विषाणू (Chandipura Virus) संक्रमितांची संख्या हळूहळू वाढत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून (Chandipura Virus Outbreak) आतापर्यंत 50 जणांना चंडीपुरा व्हायरस संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 14 जण हिम्मतपूर येथील आहेत. त्यापैकी सात जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. पटेल यांनी नमूद केले की, तीन प्रकरणे इतर राज्यांमध्येही उद्भवल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या विषाणूची माहिती गावे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी जनतेला दिलासा देताना म्हटले की, या उद्रेकाला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी (CDHO) आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रतिनिधींसह विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्य सरकार या विषाणूच्या नियंत्रणासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. (हेही वाचा, Nipah Virus Outbreak in Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसचे संकट अद्याप कायम; मलप्पुरममध्ये 14 वर्षांच्या मुलाची चाचणी सकारात्मक)

लहान मुलांमध्येही लक्षणे

प्राप्त माहितीनुसार, गुजरातमध्ये, चंडीपुरा विषाणूची लक्षणे प्रामुख्याने मुलांमध्ये आढळून आली. ज्यामुळे आरोग्य वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. संक्रमितांचे नमुने घेऊन त्यापैकी सात नमुने हे चाचणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. त्यापैकी एकूण प्रकरणांपैकी केवळ एका व्यक्तीस विषाणूची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली. चंदिपुरा विषाणूमुळे रुग्णास सूज आणि डायरिया सुद्धा होतो.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गुजरात माहिती विभागाच्या अहवालानुसार गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीदरम्यान, सीएम पटेल यांनी राज्य महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा विकास अधिकारी आणि मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि उद्रेक हाताळण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला.

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यांमध्ये मॅलेथिऑन पावडर फवारणीची मोहीम सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तापाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर तातडीने आणि सखोल उपचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आरोग्य मंत्री रुषिकेश पटेल यांनी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि परिचारिकांसह तळागाळातील कामगारांनी साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना केली.

दरम्यान, सांगितले जात आहे की, गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये चांदीपुरा विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील अनेकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.