Good News! या आठवड्यात मिळू शकते Zydus Cadila ची कोरोना विरोधी लस ZyCoV-D ला मंजुरी; 12 पेक्षा जास्त वयाच्या मुलांना मिळणार Vaccine
Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) विरोधातील युद्धात या आठवड्यात एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) कोरोना लसीला या आठवड्यात आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिला यांनी गेल्या महिन्यात आपली कोविड-19 लस झीकोव्ह-डीच्या (ZyCoV-D) आपत्कालीन वापरासाठी भारतीय औषध नियंत्रक (DCGI) कडे मंजुरीसाठी अर्ज केला होता. कंपनीने गेल्या महिन्यात आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांनी आपल्या कोविड-19 लसीसाठी भारतातील 50 हून अधिक केंद्रांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत.

कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ शर्विल पटेल यांनी सांगितले होते की, या लसीला मंजुरी मिळाल्यावर ती केवळ प्रौढांनाच नव्हे तर 12 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांनादेखील दिली जाऊ शकेल. यापूर्वी, औषध नियामकाने अहमदाबादस्थित फार्मा कंपनी झायडस कॅडिलाला अधिक डेटासह परत येण्यास सांगितले होते. झायडस कॅडिला यांनी 1 जुलै रोजी ZyCoV-D च्या आणीबाणीच्या वापराच्या मंजुरीची विनंती केली होती.

ही जगातील पहिली प्लास्मिड डीएनए लस आहे. जर का या लसीला भारत सरकारकडून मुंजुरी मिळाली तर, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन नंतर ही देशातील दुसरी स्वदेशी लस असेल. प्लास्मिड हा डीएनएचा एक लहान सर्क्युलर तुकडा आहे जो मानवी शरीरात आढळतो. ही लस मानवी शरीरातील पेशींच्या मदतीने कोरोना विषाणूचे स्पाइक प्रोटीन तयार करते. यामुळे शरीराला कोरोना विषाणूचा महत्त्वाचा भाग ओळखण्यास मदत होते. अशा प्रकारे शरीरात या विषाणूविरुद्ध संरक्षण तयार होते. (हेही वाचा: Covaxin आणि Covishield लसीचे मिक्स डोस अधिक परिणामकारक- ICMR)

या लसीची चाचणी तीन डोसनुसार करण्यात आली आहे. पहिल्या डोसनंतर 21 दिवसांनी दुसरा डोईस आणि तिसरा डोस 56 दिवसांनी दिला जाईल. परंतु कंपनीने म्हटले आहे की त्यांनी या लसीची दोन डोसमध्येही चाचणी केली आहे आणि एकसारखे परिणाम मिळाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी, जॉन्सन अँड जॉन्सनची एक डोस लसीला कोविड-19 विरोधी म्हणून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली.