Gattipally Shivpal (संग्रहित संपादित प्रतिमा)

तेलंगणातून (Telangana) एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. राज्यातील हैद्राबादचे (Hyderabad) रहिवासी असणारे अवघे तीन फूट उंची असणारे गट्टीपल्ली शिवलाल (Gattipally Shivpal) हे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवणारे देशातील पहिले ठेंगू (Dwarf) व्यक्ती ठरले आहेत. देशात कोणतेही वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक आहे. भारत सरकारने परवाना मिळविण्यासाठी वयासह इतर काही अटी व नियम विहित केले आहेत. मात्र देशात प्रथमच तीन फूट उंचीच्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे. लवकरच शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याचा शिवलाल यांचा मानस आहे.

अवघी तीन फूट उंची असलेले कुकटपल्ली येथील रहिवासी 42 वर्षीय शिवलाल यांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा लागत होता. यामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या प्रवासादरम्यान लोक त्यांना टोमणे मारायचे, त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहायचे. त्यामुळे शिवलाल यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी स्वतः गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यासाठीही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकवेळा ते निराश झाले परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही.

एकदा त्यांनी अमेरिकेतील ठेंगू व्यक्ती गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ पाहिला व त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अर्ज केले, मात्र सर्वत्र त्यांना नकार मिळाला. याबाबत देशात कोणतीही आशा उरली नसल्याचे पाहून शिवलाल ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अमेरिकेत गेले. तेथून ते ड्रायव्हिंग शिकून परत आले. यादरम्यान त्यांना हैदराबादमध्ये कार डिझाइन करणाऱ्या एका व्यक्तीची माहिती मिळाली, ज्याने शिवलाल यांच्या उंचीनुसार त्यांच्या गाडीत काही बदल केले, ज्यामुळे शिवलाल यांना गाडी चालवणे सुकर झाले.

(हेही वाचा: महिला प्रवाशाच्या समोर OLA चा ड्रायव्हर करू लागला हस्तमैथुन; कंपनीने केले निलंबित, तपास सुरु)

दरम्यान, शिवलाल यांचे नाव तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले. शिवलाल आता आपल्या पत्नीला कार चालवायला शिकवत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने, तेलंगणा सरकारने गीअरशिवाय स्वयं-चालित वाहनांनाही मान्यता दिली आहे.