Shocking! महिला प्रवाशाच्या समोर OLA चा ड्रायव्हर करू लागला हस्तमैथुन; कंपनीने केले निलंबित, तपास सुरु
ओला टॅक्सी (फोटो सौजन्य - फाइल इमेज)

भारतातील ओला-उबर सारख्या कॅब सेवा महिला प्रवाशांसाठी खरच सुरक्षित आहेत का? असा सवाल अनेकवेळा उपस्थित झाला आहे. आता याच प्रश्नाला दुजोरा देणारी धक्कादायक घटना बेंगलोर (Bengaluru) येथून समोर आली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका महिला पत्रकाराला अश्लील कृत्याचा सामना करावा लागला आहे. तिने सांगितले की ती OLA कॅबने ऑफिसमधून घरी परतत होती, तेव्हा कॅबचा ड्रायव्हर तिच्यासमोर हस्तमैथुन )Masturbate) करू लागला. ट्विटरवरील एक पोस्टद्वारे तिने याबाबत माहिती दिली आहे.

या महिलेने सांगितले की, ‘जे शहर मला आपले घर वाटत त्याच शहरात आज मला असुरक्षित वाटले. मी काम संपवून घरी परतत असताना ओला कॅबचा चालक माझ्यासमोर हस्तमैथुन करत होता. माझे त्याच्याकडे लक्ष नाही असे त्याला वाटले. तसेच त्याने आपण काहीही चुकीचे करत नाही असे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी आरडाओरडा केल्यावर त्याने कॅब थांबवली. दुर्दैवाने मी त्यावेळी अंधाऱ्या रस्त्यावर होते. तो थांबला आणि निघून गेला.’

सध्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत कंपनीबाबत तक्रार आणि टीका केली आहे. ही पोस्ट चर्चेत आल्यानंतर महिला पत्रकाराच्या आरोपांना उत्तर देताना ओलाने माफी मागत, आपण आरोपी ड्रायव्हरवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. (हेही वाचा: PUBG गेमच्या नादात मुलाने घरातील तिजोरी केली खाली, तब्बल 3 लाखांची रोकड लंपास)

काही वेळाने या महिलेने ट्विट करत माहिती दिली की, ओलाने ड्रायव्हरला निलंबित केले आहे.’ मात्र, त्यानंतरही असे लोक पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, यावर विश्वास कसा ठेवायचा, असेही तिने म्हटले आहे. बेंगळुरू शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी महिला पत्रकाराच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि सांगितले की या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक पाठवण्यात आले असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.