Sex Education (Photo Credits: File Image)

जगभरातील अनेक शाळांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षणाचे (Sex Education), चांगला स्पर्श-वाईट स्पर्श यांचे धडे दिले जातात. सध्याच्या समाजात वावरताना या गोष्टी महत्वाच्या झाल्या आहेत, मात्र आता ब्रिटनच्या (UK) शाळांमध्ये मुलांना 'लैंगिक शिक्षण' नावाखाली अश्लील गोष्टी दाखवल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

इथे 17 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हस्तमैथुन (Masturbation), संभोग (Sex) आणि गुदमैथुनबद्दल (Anal Sex) सांगितले जात आहे. हे सर्व 'रिलेशनशिप अँड सेक्स एज्युकेशन (RSE)'च्या नावाखाली शिकवले जात आहे.

सप्टेंबर 2020 पासून यूकेमधील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी नातेसंबंध शिक्षण अनिवार्य झाले. त्याच काळात माध्यमिक शाळांमध्ये नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षण अनिवार्य झाले. हे शिक्षण देण्यासाठी रंगीबेरंगी पुस्तकांशिवाय कार्टून चित्रांचाही वापर केला जात आहे. मुलांना वेगवेगळ्या लिंगांबद्दलही माहिती दिली जात आहे.

महत्वाचे म्हणजे पौगंडावस्थेतही न पोहोचलेल्या मुलांना लैंगिक आणि नातेसंबंध शिक्षणाच्या नावाखाली अडल्ट ग्राफिक्स आणि अश्लील चित्र-व्हिडीओ दाखवले जात आहेत. त्यांना नॉन-बायनरी म्हणजे काय हे सांगितले जात आहे. शिक्षणाचा भाग म्हणून मुलगा आणि मुलगी कसे हस्तमैथुन करतात हे 9 वर्षांच्या मुलांना सांगितले जात आहे. यासोबतच त्यांना एलजीबीटीक्यू+ (LGBTQ+) लोकांबाबतही माहिती दिली जात आहे. (हेही वाचा: सावधान, पोर्न पाहण्याच्या अतिरेकाचा आरोग्यावर होतोय मोठा दुष्परीणाम- अहवाल)

यासाठी 'कोरम लाइफ एज्युकेशन' आणि ब्रुक अँड सेक्स एज्युकेशन फोरम (SEF) सारख्या अनेक संस्थांनी सहभाग घेतला आहे. अनेक कार्यकर्तेदेखील शिक्षक बनून मुलांना हे शिक्षण देत आहेत. या संस्था वैयक्तिक, सामाजिक, आरोग्य आणि आर्थिक शिक्षणावर कार्यक्रम आयोजित करतात. दरवर्षी 6 लाख मुले या कार्यशाळांचा भाग बनतात. सरकारी धोरणांमध्येही या संस्था आपले मत देतात.