Fortune's '40 Under 40': ईशा आणि आकाश अंबानी यांचा फॉर्च्युन '40 अंडर 40' च्या यादीमध्ये समावेश, Jio ला चालना देण्यात बजावली मुख्य भूमिका
इशा व आकाश अंबानी (संग्रहित संपादित प्रतिमा)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) व मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) यांचा फॉर्च्युन मॅगझिनच्या '40 अंडर 40' (Fortune's '40 Under 40') यादीमध्ये समावेश झाला आहे. जिओ प्लॅटफॉर्मच्या प्रगतीसा त्यांनी जी खास भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचे नाव फॉर्च्युन मॅगझिनमध्ये झळकले आहे. या यादीमध्ये भारतामधील बायजूचे (Byju's) संस्थापक बी. रवींद्रन यांचादेखील समावेश आहे. यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहाय्यक कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर जगातील बड्या टेलिकॉम कंपन्यांमध्येही जिओने आपले स्थान बनविले आहे.

फॉर्च्युनने यावेळी मासिकाने वित्त, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, राजकारण आणि माध्यम आणि करमणूक या श्रेणींमध्ये यादी प्रसिद्ध केली आहे. या मासिकाने प्रत्येक प्रकारात जगातील 40 प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश केला आहे. या यादीमध्ये समाविष्ट केलेले सर्व 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ईशा आणि आकाश अंबानी यांची नावे तंत्रज्ञानाच्या वर्गात समाविष्ट केली गेली आहेत. फॉर्चूनच्या म्हणण्यानुसार ईशा आणि आकाश अंबानी यांनी जिओला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दोघांनी फेसबुकबरोबर 9.99 टक्के भागभांडवलासाठी 7 5.7 अब्ज डॉलर्सचा मेगा सौदा यशस्वीपणे पूर्ण केला. गूगल, क्वालकॉम, इंटेल या कंपन्यांना रिलायन्सशी जोडण्याचे आणि त्यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्याचे कामही या दोघांच्या नेतृत्वात पूर्ण झाले.

आकाश अंबानी 2014 मध्ये अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्राची पदवी घेऊन, कौटुंबिक व्यवसायात सामील झाला. त्याचबरोबर ईशा अंबानी 1 वर्षानंतर जिओमध्ये दाखल झाली. ईशाने येल आणि स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. फॉर्च्युनने लिहिले आहे की, जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला किरकोळ व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी JioMart सुरू करण्याची योजना आखली तेव्हा ईशा आणि आकाश अंबानी यांनी त्याच्या प्लानिंगमध्ये विशेष भूमिका बजावली. या दोघांनी JioMart चे संपूर्ण नियोजन करून ते यशस्वीरित्या सुरू केले. (हेही वाचा: जिओ फायबर अनलिमिटेड फ्री ट्रायल प्लान घोषीत; वैधता, दर आणि स्पीड घ्या जाणून)

आणखी एक भारतीय ज्यांनी या यादीमध्ये स्थान मिळवले आहे ते, बी. रवींद्रन यांच्याविषयी फॉर्च्युन मासिकाने म्हटले आहे की, ‘त्यांनी एक यशस्वी ऑनलाइन शिक्षण कंपनी तयार करणे शक्य आहे हे जगाला दाखवून दिले.’ त्यांची कंपनी बायजू ही भारतातील सर्वात मोठी शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान ही कंपनी लाखो मुलांना आपला अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करत आहे.