Forbes' 100 Most Powerful Women: फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात 100 शक्तिशाली महिलांची यादी; Mackenzie Scott पहिल्या स्थानावर, Nirmala Sitharaman यांचाही समावेश
Finance Minister Nirmala Sitharaman (Photo credits: ANI)

फोर्ब्स या सर्वात लोकप्रिय मासिकाने जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यावेळी मॅकेन्झी स्कॉट यांनी जर्मन चांसलरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली महिला बनल्या आहेत. मॅकेन्झी स्कॉट या जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (अमेझॉन ग्रुपचे मालक) यांची माजी पत्नी आहे. 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही या यादीत स्थान मिळाले असून, त्या 37 व्या क्रमांकावर आहेत.

या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बारा या यादीत चौथ्या स्थानावर आहेत, तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स पाचव्या स्थानावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, फोर्ब्सने सलग तिसऱ्यांदा 'जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला'च्या यादीत सीतारमण यांना स्थान दिले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांच्यापेक्षा दोन स्थानांनी पुढे आहेत. Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर यांना देखील या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्या या यादीत 88 व्या स्थानावर आहेत. फाल्गुनी नायर, शेअर बाजारात त्यांच्या कंपनीच्या उत्कृष्ट पदार्पणानंतर, अलीकडेच भारतातील सातव्या महिला अब्जाधीश आणि सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित अब्जाधीश बनल्या आहेत.

या यादीमध्ये भारतातील अजून एका महिलेला स्थान देण्यात आले आहे. फोर्ब्सने एचसीएल टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नाडर यांना 52 वे स्थान दिले आहे. रोशनी नाडर या देशातील आयटी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. फोर्ब्सने बायोकॉनच्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार शॉ यांचाही या यादीत समावेश केला असून, त्यांना 72 वे स्थान देण्यात आले आहे. (हेही वाचा: इस्रायलचे Tev Aviv ठरले जगातील सर्वात महागडे शहर; स्वस्त शहरांच्या यादीत भारताच्या Ahmedabad चा समावेश)

यासह ब्रिटनची राणी एलिझाबेथ 70 व्या स्थानावर आहे, तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी 2021 मध्ये पहिल्यांदा या यादीत स्थान मिळवले. त्या 43 व्या क्रमांकावर आहेत.