Tev Aviv (संग्रहित संपादित प्रतिमा)

इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट (EIU) ने जगभरातील शहरांची राहण्याच्या दृष्टीने खर्चाच्या बाबतीत क्रमवारी लावली आहे. ईआययुने जगातील सर्वात महागडी आणि सर्वात सर्वात स्वस्त शहरांची (World's Most Expensive and Cheapest Cities) यादी जाहीर केली आहे. 173 शहरांमधील वस्तू आणि सेवांच्या यूएस डॉलरमधील किंमतींच्या तुलनेच्या आधारे हा जगव्यापी खर्चाचा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमवारीत इस्रायलचे तेल अवीव हे जगातील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले गेले आहे. जगातील इतर शहरांच्या तुलनेत येथे राहण्याची किंमत खूप जास्त आहे.

पूर्वीच्या अहवालाच्या तुलनेत यावेळी तेल अवीव पाच स्थानांनी वर चढून पहिल्या क्रमांकावर आला आहे. तेल अवीवला त्याचे राष्ट्रीय चलन, शेकेल (ज्यूंचे एक प्राचीन नाणे), वाहतूक आणि घरगुती वस्तूंच्या किंमती डॉलरच्या तुलनेत वाढल्यामुळे रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळाले आहे. पॅरिस आणि सिंगापूर या क्रमवारीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यापाठोपाठ झुरिच आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर न्यूयॉर्कला सहावे तर जिनिव्हाला सातवे स्थान मिळाले आहे. कोपनहेगन आठव्या स्थानावर, लॉस एंजेलिस नवव्या स्थानावर आणि जपानचे ओसाका शहर 10 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात पॅरिस, झुरिच आणि हाँगकाँग संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होते.

या क्रमवारीत, सीरियाची राजधानी दमास्कस हे राहण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त शहर म्हणून ओळखले गेले आहे. स्वस्त शहरांच्या क्रमवारीत लिबियाचे त्रिपोली, उझबेकिस्तानचे ताश्कंद, ट्युनिशियाचे ट्युनिस, कझाकिस्तानचे अल्माटी, पाकिस्तानचे कराची, भारताचे अहमदाबाद, अल्जेरियाचे अल्जियर्स, अर्जेंटिनाचे ब्युनोस आयर्स आणि झांबियाचे लुसाका शहर यांचाही समावेश आहे.

यंदाची आकडेवारी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील घेण्यात आली आहे. जेव्हा जगभरात कच्चा माल आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक किमतींमध्ये सरासरी 3.5% वाढ झाली, जो गेल्या पाच वर्षातील सर्वात वेगवान महागाई दर आहे.