Zomato (Photo Credits: IANS)

कोविड 19 च्या गंभीर संकटात फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने  मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गोल्ड सपोर्ट फंडच्या माध्यमातून 3,100 हून अधिक रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना मदत करण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल 2.64 कोटींची तरतूद झोमॅटोने केली आहे. या संदर्भात माहिती देताना झोमॅटो कंपनीने सांगितले की, "गोल्ड सपोर्ट फंडच्या (Gold Support Fund) माध्यमातून जमा झालेली रक्कम 378 रेस्टॉरंटमधील 3100 हून अधिक कर्मचाऱ्यांना मदत म्हणून देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी या रक्कमेचे वाटप करण्यात आले."

झोमॅटोच्या या मदतीतून प्रत्येक रेस्टॉरंट कर्मचाऱ्याला अंदाजे 7500 रुपये मदत मिळाली आहे. तसंच झोमॅटोच्या एप्रिल महिन्याच्या गोल्ड मेंबरशिपमधून मदतीचा निधी जमा करण्यात आला आहे. या मदतीच्या निधीमध्ये सहभागी झालेल्यांना झोमॅटोने वर्षभराची मेंबरशीप फ्री मध्ये दिली आहे. (दिल्ली मध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयला Coronavirus ची लागण; 72 कुटुंबातील सदस्य क्वारंटाईन)

झोमॅटो गोल्ड मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांचे झोमॅटोने आभार मानले आहेत. "या कठीण काळात झोमॅटो गोल्ड सपोर्ट फंडात सहभागी झालेल्या सर्व ग्राहकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तुम्ही रेस्टॉरंट कम्युनिटीला गरजच्या काळात मदत केली आहे," असे म्हणत कंपनीने ग्राहकांना धन्यवाद दिले आहेत.

झोमॅटोच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, "जमा झालेल्या फंडापैकी 10% रक्कम म्हणजेच 26.5 लाख रुपये NRAI कोविड 19 रिलिफ फंडाला देण्यात आले आहेत. यामुळे रेस्टॉरंट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच मदत होईल." कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटात लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात झोमॅटोचे हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे.