Omar Abdullah (Photo Credits- Twitter)

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) गुलमर्गमध्ये (Gulmarg) आयोजित केलेल्या एका फॅशन शोवरून (Fashion Show) मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये मॉडेल्सना बर्फाळ वातावरणात अर्धनग्न कपड्यांमध्ये चालताना दाखवण्यात आले होते, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग येथे रमजानच्या पवित्र महिन्यात एका डिझायनर बँडने आयोजित केलेल्या फॅशन शोमुळे, राजकीय नेते आणि जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या फॅशन शोमधून अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूख हे या अश्लील फॅशन शोवर संताप व्यक्त करणारे पहिले राजकीय आणि धार्मिक नेते होते. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हुर्रियत नेते मिरवाईज उमर फारूख यांनी या फॅशन शोवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रमजान दरम्यान गुलमर्गमध्ये अशी घटना निंदनीय आहे. काश्मीर हे त्याच्या सूफी-संत संस्कृती आणि धार्मिक परंपरांसाठी ओळखले जाते, त्यामुळे अशी अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. संबंधितांना जबाबदार धरले पाहिजे. वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावर कडक भूमिका घेत, अधिकाऱ्यांकडून 24 तासांच्या आत अहवाल मागितला आहे. ते म्हणाले की, स्थानिक संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष करून, या पवित्र महिन्यात असा कार्यक्रम आयोजित करणे चुकीचे आहे.

Fashion Show in Gulmarg:

सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते राजा मुझफ्फर भट यांनीही या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पर्यटन विभाग आणि गुलमर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनीही गुलमर्गमध्ये झालेल्या फॅशन शोचा निषेध केला. खुर्शीद यांनी विचारले, रमजानच्या पवित्र महिन्यात गुलमर्गमध्ये या लज्जास्पद फॅशन शोला कोणी परवानगी दिली?. पर्यटन विभाग आणि गुलमर्ग विकास प्राधिकरणाचे (GDA) सीईओ त्यांची भूमिका स्पष्ट करतील का?. (हेही वाचा: New York Times' Most Stylish People: न्यूयॉर्क टाइम्सच्या 2024 मधील सर्वात स्टायलिश व्यक्तींच्या यादीत Radhika Merchant आणि Anant Ambani यांचा समावेश)

काश्मीर पर्यटन संचालक राजा याकूब फारूख यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, पर्यटन विभागाचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही. विभागाने त्यासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती. जेव्हा लोकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली तेव्हाच त्यांना या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळाली. दरम्यान, हा फॅशन शो 7 मार्च रोजी गुलमर्गमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तो एका प्रतिष्ठित डिझायनर लेबल अंतर्गत आयोजित स्की फेस्टिव्हलचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.