
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) यांची कंपनी टेस्लाने (Tesla) भारतात पहिले पाऊल टाकले आहे. लवकरच टेस्ला कारची भारतात विक्री सुरु होईल. मस्कच्या टेस्लाने भारतात त्यांचे नवीन शोरूम उघडण्यासाठी जागा देखील निश्चित केली आहे. सुरुवातीला, अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे शोरूम भारतातील दोन मोठ्या शहरांमध्ये उघडणार आहेत. यामध्ये दिल्ली आणि मुंबईचा समावेश आहे.
टेस्लाचे शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे असलेल्या मेकर मॅक्सिटीमध्ये उघडणार आहे. मेकर मॅक्सिटीमध्ये सुरू होणारे हे टेस्ला शोरूम 3000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. हे मेकर मॅक्सिटीच्या कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर असून, या टेस्ला शोरूमचे मासिक भाडे सुमारे 35 लाख रुपये आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे देशातील सर्वात महागडे व्यावसायिक रिअल इस्टेट हब समाजाला जातो. अशा परिस्थितीत, टेस्लाचा हा शोरूम ऑटो उद्योगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा शोरूम असणार आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील टेस्लाचे शोरूम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजमध्ये असलेल्या एरोसिटी परिसरात उघडणार आहे. हे शोरूम सुमारे 4000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या शोरूमचे मासिक भाडे 25 लाख रुपये असेल. अशाप्रकारे एलोन मस्कची कंपनी टेस्ला भारतात आल्याने अनेक मोठ्या ऑटो कंपन्यांना स्पर्धा मिळणार आहे. आता टेस्लाचा भारतात व्यवसाय कसा असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या, अमेरिकेतील सर्वात स्वस्त टेस्ला मॉडेल 3 ची किंमत कारखाना स्तरावर सुमारे 35,000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 30.4 लाख रुपये) आहे. जरी भारत सरकारने आयात शुल्क 15-20 टक्क्यांनी कमी केले, तरी रोड टॅक्स, विमा यासारख्या इतर खर्चामुळे त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 40,000 अमेरिकन डॉलर्स असेल, जी भारतीय चलनात सुमारे 35-40 लाख रुपयांच्या समतुल्य आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने केलेल्या अंदाजानुसार, भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची किंमत किमान याच रेंजमध्ये असेल. सरकारने आयात शुल्क 20 टक्क्यांनी कमी केले तरी त्याचा किमतींवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. (हेही वाचा: Ola Electric Lay Off: पुन्हा एकदा ओला करणार नोकरकपात; तब्बल 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता, कंपनीने सांगितले कारण)
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान त्यांची मस्क यांच्याशी बैठक झाली होती. त्यानंतर टेस्लाने भारतातील 13 पदांसाठी नोकरीच्या यादी पोस्ट केल्या होत्या. वृत्तानुसार, टेस्ला भारतात विक्रीसाठी त्यांच्या बर्लिन कारखान्यातून वाहने आयात करण्याचा विचार करत आहे आणि $25,000 (साधारण 22 लाख रुपये) पेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कार सादर करण्याची योजना आखत आहे. हे कोणते मॉडेल असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, भारताच्या सध्याच्या ईव्ही कार आयात धोरणानुसार, 22 लाख रुपयांची कार भारतीय बाजारात 36 लाख रुपयांपर्यंत महागू शकते.