
ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) ही 2017 मध्ये भविश अग्रवाल यांनी स्थापन केलेली भारतीय इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ओला कंपनीमधील नोकरकपातीमुळे चर्चेत आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड पुन्हा एकदा त्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी 1,000 हून अधिक कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी, पूर्तता, ग्राहक संबंध आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक विभागांमध्ये ही कपात केली जात आहे. ही कपात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी दिलेल्या सवलती आणि सेवा गुणवत्तेतील सुधारणा यामुळे वाढलेल्या तोट्यामुळे करण्यात येणार आहे.
कंपनीने गेल्या 5 महिन्यांत आधीच आणखी एक नोकर कपात केली होती. यासह नोव्हेंबर 2024 मध्येही कंपनीने सुमारे 500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता कंपनी त्यांच्या ग्राहक संबंध ऑपरेशन्स स्वयंचलित करण्यावर काम करत आहे, जेणेकरून खर्च कमी करता येईल आणि काही काम मशीनद्वारे करता येईल. ओलाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या फ्रंट-एंड ऑपरेशन्सचे स्वयंचलित आणि पुनर्रचना केली आहे, ज्यामुळे नफा सुधारला आहे, खर्च कमी झाला आहे आणि ग्राहकांचा अनुभव सुधारला आहे.’ मात्र कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची अचूक संख्या दिली नाही. (हेही वाचा: Tesla Begins Hiring In India: लवकरच भारतामध्ये होणार टेस्लाची एंट्री? PM Narendra Modi आणि Elon Musk यांच्या भेटीनंतर कंपनीने सुरु केली मुंबई व दिल्लीमध्ये नोकरभरती)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला त्यांच्या शोरूम, सेवा केंद्रे आणि वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्या विक्री आणि सेवा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या प्रक्रियेत आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनी त्यांचे लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी मॉडेल बदलत आहे. ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट 2024 मध्ये एक मजबूत आयपीओ लाँच केला, परंतु तेव्हापासून शेअरची किंमत 60% पेक्षा जास्त घसरली आहे. ग्राहकांच्या तक्रारी, सोशल मीडियावरील टीका आणि घटत्या बाजार हिस्स्यामुळे कंपनीवरही दबाव आहे. एकेकाळी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट लीडर असलेली ओला आता कमकुवत स्थितीत आहे.
ओलाने फेब्रुवारी 2025 मध्ये 25,000 युनिट्स विकण्याची माहिती दिली आहे. हा आकडा ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा खूपच कमी आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मासिक 50,000 युनिट्सची विक्री हे लक्ष्य आहे. आयपीओनंतर ओलाचा शेअर 60% ने घसरला आहे आणि त्याचा बाजारातील वाटाही कमी होत आहे. ओलाने काही दिवसांपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना माहिती दिली होती की, कंपनी त्यांच्या दोन प्रमुख पुरवठादारांसोबत नवीन अटींवर वाटाघाटी करत आहे, ज्याचा उद्देश खर्च कमी करणे आणि उत्पादनात कार्यक्षमता आणणे आहे. परंतु, ग्राहकांच्या तक्रारी, पुरवठादारांमधील वाद आणि घटत्या विक्रीमुळे ओलाच्या अडचणीत भर पडली आहे.