
नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नासाचे दोन अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स अवकाशातून पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांना 12 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) त्यांच्या जागी येणारे यान येईपर्यंत वाट पहावी लागेल आणि त्यानंतर ते निघू शकतील. ते या महिन्याच्या अखेरीस स्पेसएक्स कॅप्सूलमधून पृथ्वीवर परततील, अशी पुष्टी नासाने केली आहे. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांची मोहीम सुरुवातीला अल्पकालीन नियोजित होती, मात्र स्टारलायनर कॅप्सूलमधील तांत्रिक समस्यांमुळे ती लांबली. यामुळे या दोघांचा आयएसएसवरचा मुक्काम नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळाचा झाला आहे.
हे दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वैज्ञानिक संशोधन आणि देखभालीचे काम करत आहेत. त्यांच्या दीर्घ मुक्कामामुळे शास्त्रज्ञांना दीर्घकाळाच्या अंतराळ मोहिमांच्या परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होईल. नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळ संस्थेचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह 12 मार्च रोजी आयएसएसवर पोहोचण्यासाठी निघतील. दोन्ही क्रू एक आठवडा एकत्र राहतील, त्यानंतर विल्मोर आणि विल्यम्स स्पेसएक्सद्वारे पृथ्वीवर रवाना होतील. नासाने म्हटले आहे की, दोघेही निरोगी आहेत आणि मोहीम पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. (हेही वाचा: NASA New Report On Asteroid Hitting Earth: धोका टळला? 300 फूट रुंदीचा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याच्या शक्यतेवर नासाचा नवीन रिपोर्ट जारी)
आता नासाने या दोघांना परत आणण्यासाठी जुन्या स्पेसएक्स कॅप्सूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यम्स आणि विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे 12 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7.48 वाजता प्रक्षेपित होणाऱ्या क्रू-10 च्या आगमनावर अवलंबून आहे. क्रू-12 हे मिशन 12 मार्च रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे. त्यानंतर नवीन टीम- नासा अंतराळवीर अँनी मॅकक्लेन आणि निकोल आयर्स, रोसकॉसमॉस अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह आणि जॅक्साचे ताकुया ओनिशी हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विल्यम्स आणि विल्मोर यांची जागा घेतील.