File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

फसवणुकीची (Fraud) शेकडो प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. कधी बँकेकडून ग्राहकांची फसवणूक होते तर, कधी ग्राहक बँकेची फसवणूक करून पळून जातात. परंतु आता फसवणुकीचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये चक्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) फसवणूक झाली आहे. महत्वाचे म्हणजे ही फसवणूक चक्क बँकांनी केली आहे. लखनौमधील आरबीआय शाखेत नोटबंदीनंतर (Demonetization) बनावट नोटा (Fake Currency) जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. या नोटा 500 आणि 1000 हजारांच्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅब देखील पत्र लिहिण्यात आले आहे.

नोटाबंदीनंतर 2017 ते 2018 दरम्यान वेगवेगळ्या बँकांनी आरबीआयमध्ये एक कोटीपेक्षा जास्त बनावट नोटा जमा केल्या आहेत. आरबीआयच्या चलनात 500 रुपयांच्या 9753 आणि 1000 रुपयांच्या 5783 बनावट नोटा सापडल्या आहेत. महानगर पोलिस ठाण्यात आरबीआयच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटांची एकूण किंमत दीड कोटी असल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. आरबीआयकडे येणारे चलन हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तपासणीसाठी वेळ जातो. आता ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

या प्रकरणाची अधिक कसून चौकशी केली जात आहे. तसेच, आता पोलिसही या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करणार आहेत. माहितीनुसार, तक्रार येताच पोलिसांनी नोटांची फॉरेन्सिक तपासणी करण्याचेही ठरविले आहे. यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅब अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. आता लवकरच एफएसएलचे अधिकारी नोटा तपासण्यासाठी आरबीआय शाखेतही येऊ शकतात. सध्या तरी यामध्ये दीड कोटीच्या नोटा सापडल्या आहेत, मात्र ही बाब आणखी मोठी असू शकते असेही सूत्रांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: अलर्ट! 30 सप्टेंबरपर्यंत 'ही' 5 महत्वाची कामे करा; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान)

दरम्यान, 2000, 500 आणि 200 च्या बनावट नोटांच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 12 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये 10 कोटी आणि पंजाबमध्ये 50 लाख रुपये सापडले आहेत. आता यूपीमध्येही बनावट नोटांची प्रकाराने उघडकीस येत आहेत.