
कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली नसून येत्या 31 मार्चपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. सरकारच्या या खुलाशामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील, असे सांगून सिंह म्हणाले की, ‘किमती वाढू नयेत यासह देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.’ डिसेंबर- 2023 मध्ये सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. (Onion Export Ban Lift: कांद्याच्या निर्यातीवरील बंदी मोदी सरकारने उठवली)
कांद्याची निर्यात बंदी मागे घेण्यात आल्याचे वृत्त मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले होते. यानंतर लासलगाव घाऊक बाजारात कांद्याचे दर कडाडले होते. प्रतिक्विंटलचे भाव 1280 रुपयांवरून 1800 रुपयांवर गेले होते. मात्र ३१ मार्चपर्यंत निर्यात बंदी उठणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी अंशत: मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील अधिसूचना सोमवारी सकाळपर्यंत निघाली नव्हती. निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नमूद केले. या घटनाक्रमाचे परिणाम सोमवारी घाऊक बाजारात दिसून आले. लासलगाव बाजार समितीत सकाळी सुमारे चार हजार क्विंटलची आवक झाली. शनिवारच्या तुलनेत सरासरी दर क्विंटलला 600 रुपयांनी वाढले. सोमवारी कमाल 2101, किमान एक हजार तर सरासरी 1850 रुपये भाव मिळाले. शनिवारी ते सरासरी 1280 रुपये होते.