Eknath Shinde यांच्या शिवसेनेतून हाकलपट्टीच्या कारवाईला 'लोकशाही' विरूद्ध म्हणत दीपक केसरकरांनी दिला कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा
दीपक केसरकर । ट्वीटर

महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये बंडाळी झाली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे गट आणि भाजपा आता सत्तेमध्ये आले आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांविरूद्ध कारवाई देखील सुरू आहे. कालच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे शिवसेना नेते पदावरून हाकालपट्टी करण्यात आल्याचं पत्र उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) स्वाक्षरीने देण्यात आलं आहे. परंतू आता त्यावर बंडखोर गटाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याविरूद्ध करण्यात आलेली ही कारवाई लोकशाहीला शोभणारी नाही याचं रीतसर उत्तर पाठवलं जाईल आणि योग्य प्रतिसाद न आल्यास कायदेशीर पाऊल उचलावं लागेल असा इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे हे आता राज्याचे प्रमुख आहे त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई उचित नसल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. मात्र अजूनही उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि आमच्या कडून त्यांना प्रत्युत्तर केले जाणार नाही पण काही लढाया आता कायदेशीर होतील आणि त्यामधून समज-गैरसमज दूर होतील असा विश्वास त्यांनी मांडला आहे. राजकारणापलिकडे नाती जपण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील असेही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा:  Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' होऊ शकत नाही; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा.

शिवसेनेकडून आपण उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहू यासाठी प्रतिज्ञापत्र मागितलं जात असल्याच्या चर्चा आहेत त्यावर बोलताना शिवसैनिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असे केसरकरांनी सांगताना 100 रूपयांच्या बॉन्ड पेक्षा शिवसैनिकांसाठी हातात बांधलेला 'शिवबंधना'चा धागा अधिक मोलाचा आहे. ते प्रेम जपलं जाईल असेदेखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान गोव्यात असलेले 50 आमदार आज संध्याकाळी मुंबई मध्ये परतणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सोय केली जाणार आहे. उद्या विधानसभेत अध्यक्ष निवड आणि नंतर सरकारची बहुमत चाचणी पार पडणार आहे.