खुशखबर! आता तांदूळ, धान्य, डाळींसह रेशन दुकानात मिळणार अंडी, मासे, कोंबडी आणि मटन
रेशन दुकानात मांसाहार (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशाला कुपोषणापासून (Malnutrition) वाचवण्यासाठी आणि पोषण आहारच्या बाबतीत, देशाच्या क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी सरकारची थिंक टँक नीती आयोग नव्या प्रस्तावावर काम करत आहे. या नवीन योजनेद्वारे तुम्हाला रेशन दुकानात अंडी, मासे, चिकन आणि मटन मिळू शकते. या प्रस्तावाला नीती आयोगाच्या 15 वर्षांच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. पुढील वर्षी हा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, 1 एप्रिल 2020 पासून अंमलात येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रेशन दुकानात गहू, तांदूळ, धान्य आणि विविध डाळींबरोबर मांसाहारी गोष्टीही स्वस्त दरात उपलब्ध होतील.

नीती आयोगाच्या उच्च अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थाची यादी वाढविण्याचा सरकार विचार करत आहे. यात प्रथिने स्त्रोत म्हणून अंडी, मासे, चिकन आणि मटन यापैकी एक किंवा अधिक निवडी समाविष्ट केल्या जाऊ शकतील. वाढत्या वयासोबत, लोकांनी पौष्टिक आहाराकडे वळणे गरजेचे आहे. परंतु असे होत नाही. देशातील लोकांचे भोजन हे तेलकट, मसालेदार आणि जास्त मीठ व साखर असलेलेल आहे, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत व्हिजन डॉक्युमेंटचे उद्दीष्ट ‘प्रथिने समृध्द अन्ना’बद्दल लोकांमध्ये जागरूकता आणणे हे आहे. (हेही वाचा: #WorldFoodDay : अन्नाची नासाडी टाळत #ZeroHunger चं ध्येय गाठण्यासाठी या 5 सवयी करतील मदत)

दरम्यान, ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 मध्ये भारत 102 व्या स्थानावर आहे. अहवालानुसार ग्लोबल आशियाई देशांमध्ये भारताची क्रमवारी सर्वात वाईट आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स – 2019 मध्ये एकूण 117 देशांचा समावेश होता. भारतातील कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुपोषणाच्या बाबतीत 2014  मध्ये भारताचा क्रमांक 55 होता, 2015 मध्ये भारत 80 वा, 2016 मध्ये 97 वा, 2017 मध्ये 100 वा आणि 2018 मध्ये 103 वा क्रमांक होता.