DRDO कडून मोबाइल, लॅपटॉप ते चलनी नोटा सॅनिटाईज करण्यासाठी DRUVS, NOTESCLEAN ही खास डिव्हाईज विकसित
UVC Sanitising Cabinet (Photo Credits: IANS)

सध्या अवघं जग कोरोना व्हायरस जागतिक संकटाचा सामना करताना वॉर व्हर्सेस व्हायरस लढत आहे. कोरोना व्हायरस हा छुपा शत्रु असल्याने त्याच्याविरूद्धची ही लढाई कठीण आहे. दरम्यान संपर्कातून पसरणारा हा आजार रोखण्यासाठी आता भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO)ने एक नवं डिव्हाईस विकसित केलं आहे. Defence Research Ultraviolet Sanitiser असं त्याचं नाव असून त्याच्या मदतीने कुठल्याही संपर्काशिवाय मोबाइल, लॅपटॉप सारखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ते नोटा, पासपोर्ट सॅनिटाईज करण्यास मदत होणार आहे. रविवार (10 मे) दिवशी भारतीय संरक्षण खात्याने त्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

DRUVS मशिनच्या आतमध्ये ठेवलेल्या वस्तूला 360 डिग्रीमध्ये अतिनील किरणांचा मारा करून निर्जंतुक केले जाते. प्रॉक्सिमिटी सेन्सर स्विच ड्रॉवर ओपनिंग आणि क्लोजिंग यंत्रणेमुळे कोणताही थेट संपर्क न होता अगदी ऑटोमॅटिक पद्धतीने हे उपकरण काम करते. यामध्ये ठेवलेली वस्तू पूर्णपणे निर्जंतुक झाल्यानंतर मशिन आपोआप बंद होते.

दरम्यान RCI ने नोटांचं निर्जुंतुकीकरण करण्यासाठी NOTESCLEAN हे डिव्हाईस बनवलं आहे. एका स्लॉटमध्ये एखादी नोट ठेवली तरीही त्याचं निर्जुंतुकीकरण केलं जाऊ शकतं.नोटांचं बंडल ठेवल्यास त्यामधून एक एक नोट UVC lamps मधून जाऊन त्या स्वच्छ केल्या जातील. सध्या लॉकडाऊन असल्याने सारेच व्यवहार ठप्प झाले आहे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी लहान सहान गोष्टींना हात लावणं मोठं धोकादायक ठरू शकतं. अशावेळेस सामान्यांचे नियमित व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हे डिव्हाईस फायदेशीर ठरू शकतं.