Dilip Walse Patil vs Sharad Pawar:  शरद पवारांवरील टीकेवर दिलीप वळसे पाटलांकडून खास व्हीडिओ द्वारा खुलासा (Watch Video)
Sharad Pawar, Dilip Walse Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना-भाजपाच्या युतीच्या सरकारमध्ये काही महिन्यांपूर्वीच एनसीपीचा (NCP) एक गट सहभागी झाला आहे. त्यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बोलताना थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामध्ये आता एकेकाळी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राहिलेले दिलीप वळसे पाटील देखील सहभागी झाले आहेत. काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना वळसे पाटील यांनी 'शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही' असं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर शरद पवारांच्या एनसीपी गटाकडून टीकेची राळ उठवण्यात आली आहे. जीतेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक एनसीपी नेत्यांनी वळसे पाटीलांना लक्ष्य केले आहे.

सध्या महाराष्ट्रातून वळसे पाटील यांच्यावर टीका होत असल्याने अखेर त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी आपण केवळ खंत बोलून दाखवली आहे. 'पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.'असं त्यांनी ट्वीट शेअर करत म्हटलं आहे.

पहा वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण

शरद पवारांच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीकडून असं विधान आल्यानंतर रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलांचा निषेध केला आहे. “मला आश्चर्य वाटतंय. लोक कदाचित असं म्हणतील की शरद पवारांच्या आसपास जे लोक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने जबाबदारी पार पाडायला हवी होती, ती त्यांनी पार पाडली नसावी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे बहुमत मिळालं नाही”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.