दिल्ली-एनसीआरमधील (Delhi-NCR) वायू प्रदूषण (Air Pollution) अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. एअर क्वालिटी इंडेक्सने (AQI) बर्याच भागात 900 ची मर्यादा ओलांडली आहे. 310-400 एक्यूआयची पातळी आरोग्यासाठी अत्यंत वाईट मानली जाते. अशा स्थितीत दिवाळीपूर्वी दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा आणि फरीदाबाद या ठिकाणी विषारी हवेचा परिणाम लोकांवर दिसू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार इथल्या जवळपास 73 टक्के घरातील लोक आजारी आहेत. लोकल सर्कल (LocalCircles) नावाच्या कंपनीने वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेता हे सर्वेक्षण केले आहे. त्याद्वारे विषारी हवेचा लोकांवर किती परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सर्वेक्षणानुसार, विषारी हवेमुळे लोक थंडी, घसा खवखवणे आणि डोळ्यातील जळजळ होण्याची तक्रार करीत आहेत. याशिवाय खराब हवेमुळे लोकांना श्वास घेण्यातही त्रास होत आहे. यामुळे बर्याच लोकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. या सर्वेक्षणांतर्गत दिल्ली एनसीआरमध्ये सुमारे 35 हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. याअंतर्गत, दिल्ली आणि गुरुग्राममधील 13 %, नोएडा आणि गाझियाबादमधील 19% आणि फरीदाबादमध्ये 17 % लोक म्हणाले की त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्यावर वायू प्रदूषणाचा परिणाम झाला नाही. तर 73 टक्के कुटुंबांनी म्हटले आहे की, त्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी आहे.
दीड महिन्यांपूर्वी असेच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी असे दिसून आले होती की, 65 टक्के घरामध्ये विषारी हवेमुळे एक तरी व्यक्ती आजारी होती. म्हणजेच, अलिकडच्या काळात विषारी हवेचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विषारी हवेबरोबरच दिल्लीत सध्या कोरोना विषाणूचीही संख्या वाढत आहे. आजकाल दररोज सुमारे 7 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशात बाहेर इतकी वाईट परिस्थिती असूनही जवळजवळ 22 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात ते मित्रमंडळी किंवा जवळच्या लोकांच्या घरांना भेटी देतील.
हे वायू प्रदूषण पाहता, नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) ने 7 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशातील खरव किंवा वाईट वायू गुणवत्तेच्या शहरांमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.