हेराल्ड हाऊस दोन आठवड्यात खाली करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश; काँग्रेसला झटका
Delhi High Court | (Photo Credits: PTI)

दिल्लीतील हेराल्ड हाऊस (Herald House) खाली करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) काँग्रेसला दिले आहेत.  दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर सोनिया-राहुल गांधींच्या कंपनीने यावर चुकीच्या पद्धतीने कब्जा केला होता. त्यामुळे दोन आठवड्यात हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे.

दिल्ली हायकोर्टात नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडने (AJL) यांसदर्भात याचिका दाखल केली होती. यावेळी दिल्ली हायकोर्टाने ती फेटाळून लावली असून हेराल्ड हाऊस दोन आठवड्यात खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

30 ऑक्टोबरला 'एलएनडीओ'ने नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडला (एजेएल) नोटीस पाठवली होती. त्यात 15 नोव्हेंबरपर्यंत हाऊस खाली करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात असोसिएट जर्नल्स लिमिटेडने 12 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळेस त्यावर स्थगिती देण्यात आली होती.

भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते सुब्रमण्यम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविरुद्ध केस दाखल केली होती. यात सुब्रमण्यम यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रीय हर्डल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणारी कंपनी विकत घेण्यासाठी पक्षाच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता.