Usman Gani: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या माजी प्रमुखाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध केल्यामुळे भाजपाचा नेता आणि बिकानेर अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष उस्मान गनीला पक्षातून दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. उस्मान गनीवर शांतता भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बन्सवाडा येथे मुस्लीम समुदायाबाबत खेदजनक वक्तव्य केले होते, असा आरोप करून गनीने पंतप्रधान मोदींचा निषेध व्यक्त केला होता.  दोन-तीन दिवसांपूर्वी उस्मान गनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर तो दोन दिवस दिल्लीत होता. शनिवारी तो परतताच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: 400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही - अमित शाह)

उस्मान गनीने पंतप्रधान मोदींच्या विधानाचा निषेध केला होता. “एक मुस्लीम म्हणून मला पंतप्रधानांच्या विधानाचा खेद वाटतो. मी जेव्हा भाजपासाठी मत मागायला समाजात जातो, तेव्हा मला पंतप्रधान मोदींच्या विधानाबाबत जाब विचारला जात आहे”, असं गनी त्या मुलाखतीमध्ये म्हटला होता. या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

21 एप्रिल रोजी राजस्थानच्या बन्सवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले, “आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा ते म्हणाले की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ, तुमची संपत्ती एकत्र करून कुणाला वाटली जाणार? ज्यांचे अधिक मुलं आहेत, जे घुसखोर आहेत, त्यांना तुमची संपत्ती वाटली जाणार. तुमच्या मेहनतीचे पैसे अशाप्रकारे घुसखोरांना देणे तुम्हाला मान्य आहे का?”