कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका यावेळी संसद कर्मचाऱ्यांना (Parliament Members) बसला आहे. संसदेतील 875 कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी रविवारी सूत्रांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, महामारीची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 20 जानेवारीपर्यंत केलेल्या तपासणीतून ही आकडेवारी समोर आली आहे. अधिवेशन 31 जानेवारीला सुरू होणार असून पहिल्या भागाचा 11 फेब्रुवारीला समारोप होणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, तिसरी लाट सुरू झाल्यापासून संसदेत आतापर्यंत 2,847 चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी 875 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण चाचण्यांपैकी 915 चाचण्या राज्यसभा सचिवालयाने केल्या होत्या आणि त्यातील 271 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच वेळी, 4 ते 8 जानेवारी दरम्यान, राज्यसभा सचिवालयात 65, लोकसभा सचिवालयात 200 आणि इतर सेवांमध्ये 133 लोक संक्रमित आढळले.
देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाणार आहे. याशिवाय, नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या महिन्याच्या अखेरीस, 50 टक्के अधिकारी आणि सदस्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. यामध्ये अपंग आणि गर्भवती महिलांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार, गर्दी टाळण्यासाठी सचिवालय उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज एकत्र चालवायचे की वेगळ्या शिफ्टमध्ये, याबाबत निर्णय व्हायचा आहे.
नुकतेच राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनाही कोविड-19 ची लागण झाली आहे. त्यांना दुसऱ्यांदा कोविड-19 ची लागण झाली आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जाणार आहे जेव्हा देशाची अर्थव्यवस्था कोविड-19 च्या तावडीतून बाहेर पडत आहे. या आर्थिक वर्षात विकास दर दुहेरी अंकात असेल असा अंदाज आहे. आरबीआयने 2021-22 मध्ये जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.