Lockdowns And Unemployment: लॉकडाऊन काळात 75 लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; अनेकांच्या हातांना मिळेना काम
Unemployment | Representational Image (Photo Credits: pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीची दुसरी लाट थांबविण्यासाठी देशातील अनेक ठिकाणी दुसऱ्यांदा लॉकडाऊन (Lockdowns) लागू करण्यात आला. दुसऱ्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बसल्याने देशातील सुमारे 75 लाख कामगार बेरोजगार (Unemployment) झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या वेळी देशव्यापी न ठेवता स्थानिक लॉकडाऊन (Localised Lockdowns) लागू करण्यात आला आहे. असे असले तरी गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे 8% नोकरदारांना लॉकडाऊनचा फटका बसला, अशी माहिती भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या Centre for Monitoring Indian Economy (CMIE) संस्थेने दिली आहे.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी महेश व्यास यांनी सांगितले की, रोजगारक्षेत्रात पुढचे काही दिवस पुन्हा तेजी दिसणे काहीसे आव्हानात्मक राहील. अवघ्या एप्रिल महिन्यात मार्च महिन्याच्या तुलनेत 75 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे एकाच महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला आहे, असे व्यास यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितले. (हेही वाचा, Employment in Maharashtra: महाराष्ट्र सरकारचा कोरोना काळात बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न; तब्बल 1 लाख 32 हजार लोकांना मिळाला रोजगार)

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा राष्ट्रीय दर 7.97% इतका आहे. यापैकी शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण काहीसे कमी आहे. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण अनुक्रमे 9.78% आणि 7.13% इतके आहे. राष्ट्रीय बेरोजगारीचा एकूण दर 6.50% इतका आहे. बेरोजगारीचा हा दरमार्च आणि नोव्हेंबर महिन्यातील असून शहर आणि ग्रामीण भागातील आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावावा लागला आहे. त्यामुळे या ठिकाणचे उद्योग व्यवसाय ठप्प असून केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक उसंत मिळाली असतील तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे.

व्यास यांनी सांगितले की, मला कोरोना लाटेबाबत मला अधिक काही सांगता येणार नाही. परंतू, नोकरदार वर्गाच्या चेहऱ्यावरचा ताण आम्हाला स्पष्टपणे जाणवत आहे. येत्या काळात बेरोजगारी वाढण्याचा दर कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. देशातील कोरोना स्थिती कमी आल्यास येत्या काळात बेरोजगारीचा दर कमी होण्याचे प्रमाण वाढेल. परंतू, नजीकच्या काळात तरी तसे दिसत नसल्याचे व्यास यांनी सांगितले.