Covid-19 3rd Wave: 6 ते 8 महिन्यांनी येणार कोरोना विषाणूची तिसरी लाट; दिवसाला 1 कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य- Dr NK Arora
Coronavirus Delta Plus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट संपतेय न संपतेय तोपर्यंत तिसऱ्या लाटेची (Covid-19 3rd Wave) शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य तज्ञ संसर्गासाठी मुख्य घटक म्हणून डेल्टा व्हेरियंटकडे पहात आहेत. डेल्टाचे म्यूटेटेड रूप डेल्टा प्लस व्हेरियंटचे हे भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट आणू शकते असा अनेक अहवालांमध्ये दावा केला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल आणि ती किती गंभीर असेल, असे प्रश्न नक्कीच तुमच्या मनात असतील. आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) ने याबाबत माहिती दिली आहे. नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायझेशन प्रमुख आणि आयसीएमआरचे सदस्य डॉ. एनके अरोरा म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट उशिरा येण्याची शक्यता आहे.

अरोरा म्हणाले की, आयसीएमआरने एक अभ्यास केला आहे त्यानुसार कोरोनाच्या तिसर्‍या लाटापूर्वी देशातील प्रत्येकाला लसीकरण करण्यासाठी आपल्याकडे 6-8 महिने आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये दिवसाला 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी डेल्टा प्लस प्रकार कारणीभूत ठरेल का हे सांगणे सध्या तरी कठीण आहे, मात्र कोरोनाच्या लाटेसाठी त्याची नवीन रुपेच कारणीभूत ठरली आहेत.

ते पुढे म्हणाले की,  सध्या देशात लसीकरण ज्या वेगाने चालू आहे, त्याच वेगाने ते चालू राहिले तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपूर्वी लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाचे लसीकरण झाले असेल. यामुळे, लोकांना जितकी भीती वाटत आहे तितका तिसऱ्या लाटेचा प्रभाव असणार नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील 40 टक्के लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळण्याची अपेक्षा आहे. असे झाले तर तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 55 टक्के घट होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: नवीन धोकाः Covid-19 मधून ठीक झाल्यानंतर 13 वर्षांच्या मुलाचा मेंदू झाला निष्क्रिय; ANEC चे कर्नाटकमधील पहिले प्रकरण)

डॉ. एनके अरोरा यांनी शेवटी सांगितले की, तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वांनी हे केले तर, तिसर्‍या लाट मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकेल.