
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग अजूनही अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या विषाणू सतत आपले रूप बदलत आहे आणि म्हणूनच नवनवीन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. यादरम्यान कर्नाटकमधून (Karnataka) एक चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यातील देवांगेरे (Davangere) जिल्ह्यात एका 13 वर्षाच्या मुलाला पहिल्यांदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, व त्यानंतर आता त्याचा मेंदू निष्क्रिय झाला आहे. या मुलावर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर अनेक दिवस उपचार सुरु होते. यानंतर, आता कुठे त्याच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसत आहे.
या 13 वर्षाच्या मुलाला अॅक्युट नेक्रोटाझिंग एन्सेफॅलोपॅथी ऑफ चाइल्डहुड (ANEC) झाले असल्याचे निदान झाले आहे. तो गेले 8 दिवस रुग्णालयात भरती आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर मुलांमध्ये आढळणारा हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्याचा मेंदूवर परिणाम होतो. एसएस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक एनके कलप्पानवर म्हणाले की या आजाराची कर्नाटकमधील ही पहिली घटना आहे आणि देशातली दुसरी घटना आहे.
ते पुढे म्हणाले की, या मुलाला अजून एक आठवडा उपचाराची गरज आहे. जेव्हा तो बरा होईल तेव्हा त्याचा मेंदू किती कार्यरत आहे हे आम्हास समजेल. या आजारावर उपचार करणे खूप महाग आहे, अशी माहितीही त्यांच्या वतीने देण्यात आली. 30 किलोग्रॅम वजनाच्या प्रत्येक मुलासाठी हे इंजेक्शन 75000 ते 1 लाख रुपयांपर्यंत येते.
अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोरेडीओलॉजीनुसार, एएनईसी मुख्यतः नवजात आणि लहान मुलांवर परिणाम करते. साधारण एखाद्या व्हायरल इन्फेक्शन नंतर हा आजार होतो. द न्यूज मिनिटाच्या अहवालानुसार, या आजाराची बहुतेक प्रकरणे दक्षिण-पूर्व आशियामध्ये नोंदवली गेली आहेत आणि त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. (हेही वाचा: Mann ki Baat: कोविड-19 लस घेण्यास संकोच करु नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन)
याआधी कोरोनानंतर लहान मुलांमध्ये एमआयएस-सी (MIS-C) आजार आढळला होता. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या म्हणण्यानुसार हा एक दुर्मिळ पण धोकादायक आजार आहे. हृदय, आतडे, डोळे, मूत्रपिंड आणि मुलांच्या फुफ्फुसांवर याचा परिणाम होतो.