Covid-19 3rd Wave: Karnataka मध्ये सुरु झाली कोरोना विषाणूची तिसरी लाट? Bengaluru येथे 5 दिवसांत 242 मुलांना कोरोना विषाणूची लागण
Coronavirus. (Photo Credit: PTI)

गेल्या एक वर्षापासून देश कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी लढत आहे. देशात या व्हायरसची नुकतीच दुसरी लाट येऊन गेली असून आता तिसऱ्या लाटेची (Covid-19 3rd Wave) भीती व्यक्त केली जात आहे. ही तिसरी लाट लहान मुलांवर सर्वात जास्त परिणाम करेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. आता कर्नाटकात गेल्या पाच दिवसांत किमान 242 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सरकारी आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. येत्या काळात ही संख्या वाढू शकते, असा इशारा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, तज्ञांचा अंदाज होता की तिसरी लाट मुलांवर सर्वात जास्त परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत हे आकडे भयावह आहेत. ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिकेने म्हटले आहे की, गेल्या पाच दिवसात 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 242 मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यावरून कोविड-19 ची तिसरी लाट सुरू झाल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

आकडेवारी दर्शवते की यापैकी 106 मुले 9 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. तर 136 मुले 9 ते 19 वर्षांची आहेत. मंगळवारी राज्यात संक्रमणाची 1 हजार 338 नवीन प्रकरणे आढळली. या दरम्यान 31 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की. काही दिवसात ही प्रकरणे ‘तिप्पट’ होतील आणि हा ‘एक मोठा धोका’ आहे. कर्नाटक सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री आणि शनिवार व रविवार कर्फ्यूची घोषणा केली आहे. (हेही वाचा: Corona Virus: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे 12 राज्यांनी नाकारले, यात महाराष्ट्राचाही समावेश)

याशिवाय केरळ-कर्नाटक, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर प्रवेश करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. या काळात केवळ आरटी-पीसीआर प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल. हे प्रमाणपत्र 72 तासांपेक्षा जास्त जुने नसावे. दरम्यान, कर्नाटकात गेल्या महिन्यात कोरोनाची दररोज 1500 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लसीचा डोस दरमहा 65 लाखांवरून 1 कोटी करण्याचे आश्वासन दिले आहे. 16 ऑगस्टपासून सरकार आंशिक लॉकडाउन लागू करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.