होळी आणि रंगपंचमीचा रंगबेरंगी सण वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल देतो तसेच तो आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांसोबत आनंद सेलिब्रेट करण्याची एक संधीदेखील देतो. मात्र आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी आणि धुलिवंदनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये कोरोना व्हायरस पसरण्याची भीती असल्याने काही गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'होली मिलन' कार्यक्रमामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी देखील होळी सणाच्या सेलिब्रेशनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ट्वीटरच्या माध्यमातून याची माहिती देताना तुमची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या, सार्वजनिक ठिकाणी जाणं शक्यतो टाळा असं म्हटलं आहे. होली मिलन कार्यक्रमात यंदा सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी; कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय.
आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे 28 रूग्ण आहेत. देशाची राजधानी दिल्ली मध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली तर वैद्यकीय तयारीच्या दृष्टीकोनातून रुग्णालयांना चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
अमित शहा यांचे ट्वीट
Holi is a very important festival for we Indians but in the wake of Coronavirus, i have decided not to participate in any Holi Milan celebration this year.
I also appeal everyone to avoid public gatherings and take a good care of yourself & your family.
— Amit Shah (@AmitShah) March 4, 2020
चीनमधून पसरलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसची दहशत सध्या जगभरात पसरली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचे बळी आढळल्याने आता भारतामध्ये त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोरोना व्हायरस शिंक किंवा खोकल्याच्या तुषारामधून पसरत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणं टाळणं, हात स्वच्छ धुणं, चेहर्याला वारंवार हात लावणं टाळणं अशाप्रकारचे प्रतिबंधक उपाय सुचवले जात आहेत.